सिंधुदुर्ग : उपअभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे सध्या पोलीस कोठडीत आहेत. पण नितेश राणेंवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या आदेशावरुन कारवाई होत असल्याचा आरोप केला जातोय. याबाबत दीपक केसरकरांनी हा आरोप करणाऱ्यांना काही प्रश्न विचारले आहेत. नितेश राणे यांनी जे कृत्य केलं, ते सत्कर्म होतं का? व्हिडीओ अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलाय. राणेंवर कारवाई करायला मी कोण आहे? कारवाईसाठी न्यायालयाचेच आदेश आहेत, असं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी दिलं.
दीपक केसरकर यांनी राणेंवर काही आरोपही केले. राणेंवर गुंडगिरी, खंडणीचे गुन्हे आहेत. चिंटू शेख प्रकरण आहे. मला राजकारण करायचं असतं तर राणेंच्या केसेसचा फॉलोअप केला असता आणि सर्व राणे आज जेलमध्ये गेले असते, असंही दीपक केसरकर म्हणाले.
आंदोलन जनतेने केलं, जनतेच्या आंदोलनावेळी राणे कुठे होते? राणेंच्या माणसांनी कणकवलीतले फोन बंद पाडले, गेले सहा महिने फोन बंद आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम येत्या तीन दिवसात पूर्ण होणार आहे. हे काम राणेंच्या आंदोलनामुळे नाही, तर मी दिलेल्या आदेशांमुळे पूर्ण होईल. सिंधुदुर्गात दादागिरी होती, त्यातून मी जिल्हा बाहेर काढला. निवडणुकीच्या तोंडावर राणे पुन्हा दादागिरी सुरु करत आहेत, असा आरोप दीपक केसरकरांनी केली.
कॉन्ट्रॅक्टर चुकले, अपघात झाला तर सरळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. राणेंचं आंदोलन नाही, तर ती स्टंटबाजी आहे. राणेंच्या मारहाणीमुळे जिल्ह्यात इंजिनिअर्स, डॉक्टर्स यायला तयार नाहीत. शेडेकर यांना पूर्ण संरक्षण देण्यात आलंय. ते तणावाखाली नाहीत याची पूर्ण खात्री करून घेतली आहे, असंही केसरकर म्हणाले.
उपअभियंते शेडेकर यांना अपमानित करण्याचा अधिकार यांना कुणी दिला? त्यांनी आत्महत्या केली असती तर पुढे काय झालं असतं? तुम्ही कामातल्या चुका दाखवा, आम्ही अभियंत्यांना सस्पेंड करु. राणेंच्या प्रकारामुळे रस्त्याचं काम अर्धवट राहिलं, लोकांचे बळी गेले तर जबाबदारी कुणाची? असा सवालही दीपक केसरकर यांनी केलाय.
संबंधित बातम्या :