मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत आपण दररोज फक्त साडेतीन तास झोपत असल्याचे सांगितले. तसेच मला कामाची नशा असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज अक्षय कुमारने मोदींना अनेक प्रश्न विचारले त्याला उत्तर देताना मोदींनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यावर प्रकाश टाकला.
अक्षय कुमारने पंतप्रधान मोदींची मुलाखत घेताना सुरुवातीलाच आपण राजकीय प्रश्न न विचारता व्यक्तिगत प्रश्न विचारणार असल्याचे सांगितले. अक्षयने आपल्या मुलाखतीची सुरुवातच एका लहान मुलीच्या प्रश्नाने केली आणि मोदींना तुम्ही आंबा कसा खाता असा प्रश्न विचारला. यावर मोदींनीही दिलखुलास उत्तर देत आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
‘मी पंतप्रधान होईल असा कधी विचार केला नव्हता’
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या जीवन प्रवासाविषयी बोलताना सांगितले, ‘मी देशाचा पंतप्रधान होईल, असा मी कधीही विचार केला नव्हता. माझ्या कुटुंबाला मी नोकरी करावे, असेच वाटत होते. मला देशासाठी काम करायला लहानपणापासून आवडायचे. तेव्हा मी कोठेही सैनिक दिसले की त्यांना सलाम करायचो. लहानपणी ग्रंथालयात जाऊन मोठ मोठ्या व्यक्तींची चरित्रे वाचायलाही आवडायचे. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळायच्या.’
‘मला राग येत नाही’
तुम्हाला राग येतो का आणि आला तर तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदींनी आपल्याला कधीही राग येत नाही, असे उत्तर दिले. तसेच चपरासीपासून सचिवापर्यंत मी कुणाचाही राग करत नाही. मी शिस्तप्रिय आहे, मात्र, कुणाचाही अपमान करत नाही, असेही मोदींनी सांगितले. राग आला तरी तो व्यक्त करत नाही, असे म्हटल्यानंतर अक्षयने त्यांना राग व्यक्त करणे चांगले असते असे म्हटले. त्यावर मोदींनी त्यांच्या मागील आयुष्यात राग व्यक्त करण्यासाठी करत असलेल्या काही प्रयोगांविषयीही सांगितले. ते म्हणाले, मला जेव्हा एखाद्या गोष्टीवर राग यायचा तेव्हा मी काय घटनाक्रम झाला तो एका कागदावर लिहायचो आणि तो कागद फाडून टाकायचो. पुन्हा त्याविषयी राग वाटला की पुन्हा लिहायचो. त्यातून मी झालेल्या घटनांकडे शांतपणे पाहू शकायचो आणि स्वतःच्या चुका शोधायचो.
‘आईला सोबत का ठेवत नाही?’
आईसोबत रहावं असं वाटत नाही का? आईला सोबत का ठेवत नाही? याचे उत्तर देताना मोदी म्हणाले, ‘मी खूप लहानपणीच घर सोडले. त्यामुळे आता आई आणि कुटुंबापासून दूर राहण्याची सवय लागली आहे. तसेच मी काही दिवस आईला राहण्यासाठी सोबत आणलेही होते. मात्र, तेव्हा उशीरा घरी येण्यामुळे आईला वाईट वाटायचं. मी माझ्या कामातच व्यस्त असायचो, त्यामुळे आईला वेळही देता येत नसायचा. आईलाही तेथे करमायचे नाही. त्यामुळे आईने पुन्हा गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आईने माझ्यासाठी वेळ वाया घालवू नको, असेही म्हटले.’
मोदींच्या मुलाखतीतील महत्त्वाचे मुद्दे :
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारने आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. स्वत: अक्षय कुमारे याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली होती.
“मी काहीतरी वेगळी गोष्ट करणार आहे, ती यापूर्वी कधी केलेली नाही”, असं ट्वीट करत अक्षय कुमारने सर्वांचीच उत्सुकता वाढवली होती. नक्की अक्षय कुमार काय करणार? असा प्रश्नही अनेकांना पडला होता. अगदी राजकीय एन्ट्रीची घोषणा करणार का, इथवर अनेकांनी तर्क लढवले होते.
While the whole country is talking elections and politics, here’s a breather. Privileged to have done this candid and COMPLETELY NON POLITICAL freewheeling conversation with our PM @narendramodi . Watch it at 9AM tomorrow via @ANI for some lesser known facts about him! pic.twitter.com/Owji9xL9zn
— Akshay Kumar (@akshaykumar) April 23, 2019