नागपूर : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणुकांच्या हंगामात सत्ताधारी पक्षाची वाट धरलेली असतानाच बॉलिवूडमधलं एक मोठं नाव (Sanjay Dutt meets Nitin Gadkari) सत्ताधारी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेता संजय दत्त याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतलेली भेट (Sanjay Dutt meets Nitin Gadkari) या चर्चांना निमित्त ठरलं.
संजय दत्तने नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं संजय दत्तने म्हटलं असलं, तरी ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे वडील- दिवंगत अभिनेते सुनिल दत्त आणि बहीण प्रिया दत्त हे दोघंही काँग्रेसचे खासदार राहिलेले असताना संजय दत्तने भाजपने नेत्याची भेट घेणं (Sanjay Dutt meets Nitin Gadkari) आश्चर्यचकित करणारं होतं.
गेल्याच महिन्यात ‘राष्ट्रीय समाज पक्षा’चे नेते महादेव जानकर यांनी अभिनेता संजय दत्त आपल्या पक्षात प्रवेश करणार असल्याची पुडी सोडली होती. संजय दत्त रासपच्या वर्धापन दिन सोहळ्यामध्येच पक्षप्रवेश करणार होता, मात्र आता त्याने सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे, असा दावा त्यावेळी जानकरांनी केला होता. परंतु आपण कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी होणार नसल्याचं त्यावेळी संजय दत्तने स्पष्ट केलं होतं.
महादेव जानकर त्यावेळी काय म्हणाले होते?
‘दुबईत बसून ज्यांनी बाईट दिला, ते आमचे बिग बॉस, बिग ब्रदर संजय दत्तजी, त्यांची 25 ऑगस्टची तारीख घेतली होती, मात्र त्यांनी सप्टेंबरची तारीख घेतली आहे. नाहीतर ते आजच पक्षात जाहीर प्रवेश करणार होते. तुम्ही सांगाल त्या आमदाराच्या आणि रासपच्या प्रचाराला संजय दत्तजी स्वतः हेलिकॉप्टर घेऊन येणार आहेत’ असा दावा महादेव जानकर यांनी जाहीर मंचावर मंत्री पंकजा मुंडे यांना उद्देशून केला होता.
जानकरांच्या मेळाव्यात संजय दत्तचं उत्तर
संजय दत्तची एक क्लिप रासपच्या वर्धापन दिन सोहळ्यात दाखवण्यात आली होती. ‘माझे मित्र, माझे बंधू महादेव जानकरजी यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज मुंबईत असतो, तर नक्की आलो असतो’ असं संजय दत्त म्हणाला होता. मात्र आता संजय दत्तने नितीन गडकरी यांची भेट (Sanjay Dutt meets Nitin Gadkari) घेतली.
संजय दत्तची राजकीय कारकीर्द
लोकसभा निवडणुकांच्या वेळी संजय दत्त रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष संजय दत्तला तिकीट देण्याच्या तयारीत होते, असं म्हटलं जातं. संजय दत्तने काही वर्षांपूर्वी समाजवादी पार्टीमध्येही प्रवेश केला होता. मात्र जास्त काळ तो या पक्षात राहू शकला नाही.
संजय दत्तचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त काँग्रेस पक्षात होते. खासदार आणि क्रीडामंत्री म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये काम पाहिलं आहे. संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही मुंबईमधून खासदार म्हणून निवडून आली होती आणि यावेळीही काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली होती. संजय दत्त यांची आई नर्गिस दत्तही 1980 मध्ये राज्यसभेत नॉमिनेट झाल्या होत्या.
संजय दत्तनेही 2009 मध्ये समाजवादी पार्टीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये संजय दत्तचं नाव आल्यामुळे त्याला निवडणूक लढवता आली नव्हती. संजय दत्त येरवडा तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आला आहे.
संजय दत्त नुकताच करण जोहर दिग्दर्शित ‘कलंक’ चित्रपटात झळकला होता. संजय दत्तचे प्रस्थानम, केजीएफ 2 आणि पानिपत हे तीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. नुकतंच त्याने एका पौराणिक मालिकेसाठी निवेदन करण्याची घोषणा केली आहे.