अभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण… : महादेव जानकर

| Updated on: Aug 25, 2019 | 6:16 PM

संजय दत्त यांची 25 ऑगस्टची तारीख घेतली होती, मात्र त्यांनी सप्टेंबरची तारीख घेतली आहे. नाहीतर ते आजच पक्षात जाहीर प्रवेश करणार होते. तुम्ही सांगाल त्या आमदाराच्या आणि रासपच्या प्रचाराला संजय दत्तजी स्वतः हेलिकॉप्टर घेऊन येणार आहेत, असा दावा महादेव जानकर यांनी केला

अभिनेता संजय दत्त आज रासपमध्ये प्रवेश करणार होता, पण... : महादेव जानकर
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज रासपमध्ये प्रवेश करणार होता. मात्र आता त्याने सप्टेंबर महिन्याची तारीख दिली आहे, असा दावा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी केला आहे. रासपचा 16 वा वर्धापन सोहळा मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी जानकरांनी दावे आणि मागण्यांचा सपाटा लावला.

‘दुबईत बसून ज्यांनी बाईट दिला, ते आमचे बिग बॉस, बिग ब्रदर संजय दत्तजी, त्यांची 25 ऑगस्टची तारीख घेतली होती, मात्र त्यांनी सप्टेंबरची तारीख घेतली आहे. नाहीतर ते आजच पक्षात जाहीर प्रवेश करणार होते. तुम्ही सांगाल त्या आमदाराच्या आणि रासपच्या प्रचाराला संजय दत्तजी स्वतः हेलिकॉप्टर घेऊन येणार आहेत’ असा दावा महादेव जानकर यांनी केला आहे.

विशेष म्हणजे यावेळी संजय दत्तची एक क्लिप दाखवण्यात आली. माझे मित्र, माझे बंधू महादेव जानकरजी यांना आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज मुंबईत असतो, तर नक्की आलो असतो, असं संजय दत्त म्हणाला. त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रासपच्या महामेळाव्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार प्रवीण दरकेर आणि राहुल कुल आणि राज्यभरातून पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .

संजय दत्तची राजकीय कारकीर्द

लोकसभा निवडणुकांच्या वेळी संजय दत्त रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष संजय दत्तला तिकीट देण्याच्या तयारीत होते, असं म्हटलं जातं. संजय दत्तने काही वर्षापूर्वी समाजवादी पार्टीमध्येही प्रवेश केला होता. मात्र जास्त काळ तो या पक्षात राहू शकला नाही.

संजय दत्तचे वडील दिवंगत अभिनेते सुनील दत्त काँग्रेस पक्षात होते. खासदार आणि क्रीडामंत्री म्हणून त्यांनी काँग्रेसमध्ये काम पाहिलं आहे. संजय दत्तची बहीण प्रिया दत्तही मुंबईमधून खासदार म्हणून निवडून आली होती आणि यावेळीही काँग्रेसने प्रिया दत्त यांना उमेदवारी दिली होती. संजय दत्त यांची आई नर्गिस दत्तही 1980 मध्ये राज्यसभेत नॉमिनेट झाल्या होत्या.

संजय दत्तनेही 2009 मध्ये समाजवादी पार्टीमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये संजय दत्तचं नाव आल्यामुळे त्याला निवडणूक लढवता आली नव्हती. संजय दत्त येरवडा तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आला आहे. संजय दत्त नुकताच करण जोहर दिग्दर्शित ‘कलंक’ चित्रपटात झळकला होता.

औकात बघून जागा द्या

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांना आमचं मागणं आहे, आमच्या-आमच्या चौकात आमची औकात बघून तुम्ही आम्हाला जागा द्यायला पाहिजेत. ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे. मागच्या वेळी माझे दोन जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळी तुम्ही आम्हाला सहा जागा दिल्या होत्यात. आता माझ्याकडे 98 जण आहेत. माझ्या पक्षावर निवडून आलेले 98 लोक. दोन गुणिले सहा, 98 गुणिले किती.. एवढ्या विधानसभेच्या जागा आम्हाला महायुतीमध्ये मिळाव्यात.’ अशी मागणी महादेव जानकर यांनी केली.

आगामी विधानसभेसाठी भाजपने आपल्या पक्षाला 57 जागा सोडाव्यात अशी मागणी जानकर यांनी केली आहे. गेली 16 वर्ष रासप चार राज्यात  काम करत आहे. लवकरच राष्ट्रीय पक्ष कसा होईल यासाठी काम करणार असून यासाठी जास्तीत जास्त जागा मिळाव्यात ही अपेक्षा महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

शिवसेना भाजपमध्ये युतीबाबत सर्व आलबेल असल्याचं सांगितलं जातं. मात्र निवडणुकांच्या आधी कोणत्याही राजकीय घडामोडी घडू शकतात हे लक्षात घेऊन महादेव जानकर यांनी आपलं स्थान युतीमध्ये भक्कम करण्याचा प्रयत्न केल्याचं आज दिसून आलं