मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray on Tejas Thackeray) यांच्या संसदीय राजकारणातील प्रवेशानंतर आता एक नवी चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा आहे आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ तेजस ठाकरेच्या राजकारणातील प्रवेशाची. जसे आदित्य ठाकरे निवडणुकीच्या राजकारणात येण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत होते. त्याच पद्धतीने आता आदित्य ठाकरे यांचा लहान भाऊ तेजस ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत दिसत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे देखील राजकारणात (Political entry of Tejas Thackeray) येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आता यावर आदित्य ठाकरेंनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, “तेजसला संपूर्ण महाराष्ट्रात विविध जंगलांमध्ये जात असतो. कुठे तरी घाटात जातो आणि त्याचं काम करत असतो. मात्र, राजकीय दौरे कसे असतात हे त्याने फारसं पाहिलेलं नाही. त्याला हे पाहायचं होतं. म्हणून त्याने मी येऊ शकतो का असं विचारलं होतं. त्याला जनआशिर्वाद यात्रेतही एक-दोन ठिकाणी यायचं होतं. बुधवारी (9 ऑक्टोबर) उद्धव ठाकरे सभेसाठी जात होते. त्यांचा 2 दिवसांचा दौरा होता. त्यामुळे तो त्यांच्यासोबत गेला.”
तेजस राजकीय दौरे पाहण्यासाठी कदाचित माझ्यासोबतही येईल, असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं. तेजस ठाकरे राजकारणात येणार की नाही यावरही त्यांनी थेट उत्तर दिलं. ते म्हणाले, “तेजस राजकारणात प्रवेश करेल असं मला वाटत नाही. पण तरिही राजकारणात प्रवेश करायचा की नाही हा निर्णय संपूर्ण त्याचा असेल. मी राजकारणात सर्वांचंच स्वागत करेल.” यावेळी त्यांनी जंगलातील वाईल्ड लाईफ आणि राजकारणातील वाईल्ड लाईफ यात फरक असतो, असंही हसत नमूद केलं.
विशेष म्हणजे याआधी उद्धव ठाकरे जेव्हा बाहेर असायचे तेव्हा त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे दिसायचे. आता तेजस ठाकरे असतात. याचा काय अर्थ घ्यायचा असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आदित्य ठाकरे यांनी हसून हे त्यालाच विचारायला हवं असं उत्तर दिलं.
अभिजीत बिचुकले यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मी कोणत्याही व्यक्तीवर, उमेदवारावर किंवा नेत्यावर बोलत नाही, बोलणार नाही. मी केवळ शिवसेना काय करणार यावरच बोलतो. आम्ही वरळीसाठी आमचं काय व्हिजन आहे ते सांगितलं आहे. त्यानुसार आम्ही काम करु.”
ओवेसींच्या आव्हानाला प्रत्युत्तर
शिवसेनेने याआधीही समान नागरी कायद्यावर लिहिलेले आहे. आम्ही नेहमीच समान नागरी कायद्यावर बोलत आलो आहे. शिवसेनेच्या मंचावर शिवसेनेने आपली भूमिका अनेकदा मांडली आहे. देशात शिवसेना भाजपने मागील 30 ते 35 वर्ष कलम 370 वर भूमिका मांडली. ते आश्वासन पूर्ण केलं. लवकरच राम मंदिराचं आश्वासनही पूर्ण करु. जनतेने बहुमत देऊन जो आशिर्वाद दिला आहे त्याच्या जोरावर आम्ही आमची सर्व आश्वासनं पूर्ण करत आहोत.”