मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सहाव्या जागेवरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांना मैदानात उतरवण्यात आलंय. तर भाजपनं धनंजय महाडिकांना उमेदवारी दिलीय. अशावेळी युवासेना अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मोठा दावा केलाय. त्याचवेळी काश्मिरी पंडितांच्या मुद्द्यावरुन त्यांनी केंद्र सरकार आणि भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. राज्यसभा निवडणूक जिंकुच, पण सध्या काश्मिरी पंडितांचा मुद्दा गंभीर आहे. केंद्र सरकार काय करणार हे सांगावे लागेल. निवडणुका येतात आणि जातात; पण सध्या काश्मिरी पंडितांचा (Kashmiri Pandit) मुद्दा जास्त महत्त्वाचा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.
सध्या काश्मीरमधील वातावरण चिंताजनक आहे. सर्वाधिक खेदजनक बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही तेथिल चित्र बदललं नाही. याउलट वातावरण आणखी खराब झालं आहे. महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच काश्मिरी पंडितांसाठी खुले आहेत. भाजप नेते काश्मिरी पंडितांवर, काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या पल्बिसिटीबाबत किंवा कमाईबाबत बोलणार नाही. आता जाब विचारण्याऐवजी काय ठोस पावले उचलता येतील, यावर ठोस कारवाई करावी लागेल, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा आहेत. पण अशाप्रकारच्या मोहिमा 12 महिने सुरु ठेवण्याची गरज आहे. उद्या शासनाचा माझी वसुंधरा हा पुरस्कार सोहळा होणार आहे. त्यात शासनाचे काम समजेल. एकूण 82 पुरस्कारांचे वितरण उद्या केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
ठिकठिकाणी वृक्षारोपण होत आहे ही चांगली बाब आहे. रस्त्याशेजारी जे स्ट्रीट ट्री आहेत, त्याशिवाय पिंपळ आणि वडाच्या मोठ्या झाडांचा समावेश आहे. यामध्ये जुनी झाडे कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेत आहोत. झाडांच्या फांद्या छाटणे आणि इतर काळजी घेतली जात आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.
अयोध्या दौऱ्याचे नियोजन म्हणजे फक्त भगवान रामाचे दर्शन घेणार आहे. तेथील संघर्ष आता संपला आहे. किल्ले शिवनेरीवरुन तिथे माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर योगायोगाने कोर्टाच्या केसला चालना मिळाली. निकालामुळे मंदिर निर्माण होत आहे. आता आशीर्वाद घ्यायला जात आहोत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.