मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटाला सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयानं मोठा दिलासा मिळालाय. विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 11 जुलैपर्यंतचा वेळ दिलाय. तोपर्यंत बंडखोर आमदारांना कुठल्याही कारवाईपासून संरक्षण देण्यात आलं आहे. शिंदे गटाला हा मोठा दिलासा असला तरी शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना हा मोठा धक्का मानला जातोय. अशावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवलाय. व्हॉट्सअपवरील एक मेसेज सांगत गुवाहाटीला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, अशी स्थिती झाल्याची टीका आदित्य ठाकरे भाजपवर केलीय. तसंच या बंडाळीमागे मी पुन्हा येईन म्हणणारे तर नाहीत ना, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर केलाय.
शिवसेनेत असताना त्यांना मान-सन्मान, स्वाभिमान मिळायचा. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या बाजूला खुर्ची मिळायची. पण आता सूरतला गेल्यावर काय त्यांची अवस्था, हलत आहेत, डुलत आहेत, कशामुळे ते मला माहिती नाही. पण आमदारांना जणू काही कैदी अशाप्रकारे हाताला, मानेला पकडून नेताचे व्हिडीओ समोर आलेत, याचं मला दु:ख वाटतं. महाराष्ट्राचा आमदार सुरतेवरुन गुवाहाटीला जाताना असे हाल होतात, अशी अवस्था होते, यामागे आहे कोण? कुठले अदृश्य हात आहेत का? कुठला दुसरा पक्ष आहे का? जे म्हणतात पुन्हा येईन, पुन्हा येईन ते आहेत. पण त्यांना मला सांगायचं आहे, महाराष्ट्र हरणार नाही, महाराष्ट झुकणार नाही, महाराष्ट्र माफ करणार नाही.
मला काही व्हॉट्सअप येत आहेत, साहेब कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, उत्तर येईल गुवाहाटीला नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. अरे लाज वाटण्यासाठी गोष्ट झाली. आजपर्यंत आम्ही खाती बदलली नव्हती, पण आज बदलावी लागली. कारण नगरविकास मंत्री गायब, एमएसआरडीसी मंत्री गायब, आता पावसाला विलंब होतोय, पेरणी करायची की नाही करायची? असा सगळा गोंधळ असताना कृषीमंत्री मिसिंग आहेत. पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय अशावेळी पाणीपुरवठा मंत्री गायब आहेत.
निवडणुकीला सामोरं जायची, समोर येऊन बोलायची तुमच्यात हिंमत नाही. पण जिथे जाऊन तुम्ही मजा मारत आहात. तिथे महापूर आलाय. लोकांची घरं वाहून गेली आहेत. लोकांना खाण्यासाठी अन्न नाही, घालण्यासाठी कपडे नाहीत, राहण्यासाठी घर नाही. पण आपले बिकाऊ आमदार तिकडे जाऊन मजा मारत आहेत. त्यांचा दिनक्रम समोर आलाय. सकाळी दहा साडे दहाला उठतात, ब्रेकफास्ट करतात, दुपारी नाचगाण्याचा कार्यक्रम होतो असं मला ऐकायला मिळतंय, जेवण करतात, झोपतात, पुन्हा संध्याकाळी डान्स प्रोग्राम होत असेल, असंही कळतंय. हे आमदार फक्त खाण्यावर प्रत्येक दिवशी 8 लाख रुपये उडवतात. काही तर असे आहेत की सात वाजल्यानंतर थरथरायला लागतात, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांनावर टीकेची झोड उठवलीय.