मुंबई : सत्ता गेल्याचं दु:ख समजू शकतो, आता त्यांनी ट्वीट करत राहावं, अशा शब्दात शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीसांच्या ‘ट्वीटहल्ल्या’ला उत्तर दिलं आहे. ‘बरनॉल द्या’ असं मी सांगणार नाही, असा खोचक टोलाही आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray on Amruta Fadnavis) लगावला.
जे बाहेर पडले सत्तेतून, ज्यांनी वचनं पाळली नाहीत. त्यांच्या मनात दुःख असेलच. ते दुःख समजून घेऊ शकतो मी. बरनॉल द्या असं मी सांगणार नाही. पण ठीक आहे, आम्ही आमच्या कामावर फोकस्ड आहोत. लोकांनी विश्वास ठेवला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ट्रोलवर राग येणं स्वाभाविक आहे, पण मी सगळ्यांना सांगेन, की रागावर आता कंट्रोल करा. कारण जे वचनं न पाळता सत्तेबाहेर पडले, किंवा पाडले गेले, त्यांना दुःख होणार. जेलसी होणार. पण त्यांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांच्या हातात फोन देऊ. जिथे त्यांनी इंटरनेट बंद केलं नसेल, तिथून ट्वीट करत राहतील, असा टोमणाही आदित्य ठाकरेंनी मारला.
बरनॉल क्रीम प्रकरण काय?
पहाटे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होऊ लागले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थकांनी भाजप समर्थकांना मीम्समधून टोला लगावला होता. याच मीम्समध्ये बरनॉल क्रीमचा उल्लेख अनेकदा झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
सत्तास्थापनेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या भाजप समर्थकांचा फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर जळफळाट झाला असेल तर बरनॉल लावावं, असा सल्ला दिला जात होता. विशेष म्हणजे बरनॉल क्रीमसंदर्भातील गुगल सर्चमध्येही वाढ झाल्याचं दिसलं होतं.
ट्विटरवॉर कसा सुरु झाला?
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील विधानावरुन ट्विटरवर टीका केली होती. फडणवीसांचं ट्वीट कोट करुन अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. “खरं आहे देवेंद्र फडणवीसजी. त्याचप्रमाणे ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना टॅगही केलं होतं.
अमृता फडणवीसांवर शिवसेनेतून चहूबाजूने टीकेची झोड उठली होती. नगरसेवकांपासून शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदींपर्यंत अनेकांनी मिसेस फडणवीसांना टोला लगावला होता. त्यानंतरही अमृता फडणवीस थांबल्या नाहीत.
शिवसेना महिला आघाडीच्या आंदोलनाचा व्हिडीओ अमृता फडणवीस यांनी स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. लोकांच्या माथी मारुन तुम्ही नेतृत्व सिद्ध करु शकत नाही, तो एक हल्ला असतो, नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे !” असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.
Aditya Thackeray on Amruta Fadnavis