मुंबई : सध्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचं (Gujrat Election 2022) वार वाहतंय. या निवडणुकीच्या प्रचारात सर्वच पक्षांचे वरिष्ठ नेते मैदानात उतरलेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील इतर भाजप नेते गुजरातमध्ये प्रचारासाठी जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याचं बोललं जात आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय.
आज मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे. कारण आपले मंत्री गुजरातच्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने आधी सरकार स्थापन करण्यासाठी आमदार गुजरातला पाठवले. मग तरूणांच्या हाताला रोजगार देणारे मोठे प्रकल्प गुजरातला पाठवले आणि आता तर निवडणूक प्रचारासाठी मंत्रीही गुजरातला पाठवले!, यांना महाराष्ट्रातील प्रश्नांपेक्षा गुजरातची निवडणूक महत्वाची आहे, असं म्हणत आदित्य यांनी शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधलाय.
आदित्य ठाकरे आज बिहार दौऱ्यावर आहेत. यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार आहेत. “आज मी बिहार दौऱ्यावर आहे. मी आणि तेजस्वी एकाच वयाचे आहोत. ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. पर्यावरणीय बदलांसंदर्भात काय करता येईल, याबाबतही चर्चा करायची आहे”, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
दिशा सालियान प्रकरणाचा आज सीबीआय अहवाल समोर आलाय. यावर आदित्य ठाकरेंना विचारलं असता, मला त्या घाणेरड्या राजकारणात बोलायचं नाही, असं आदित्य म्हणालेत.
राज्यपालपदी असताना कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल जे विधान केलं ते चूकच आहे. देवेंद्र फडणवीसजी, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही तुमची भुमिका स्पष्ट करा. कोश्यारींवर काय कारवाई करणार ते सांगा, असं आदित्य ठाकरे म्हणालेत.