नागपूरः 32 वर्षांच्या तरुणाने या खोके सरकारला हलवून ठेवलंय, हेच आजच्या प्रकारावरून दिसून आलं, अशी प्रतिक्रिया माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली. दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिले. विधानसभेत आज सत्ताधारी आमदारांनी ही मागणी लावून धरत आज सभागृहात अनेकदा गोंधळ घालत सभागृह तहकूब करण्यास भाग पाडले. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचा संबंध आहे का, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणी करण्यात आली. अधिवेशनात सुरुवातीपासूनच या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रचंड गदारोळ झाला.
अखेर गृहमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर विधानभवन परिसरात आदित्य ठाकरेंनी माध्यमांना मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, ‘ मी अडीच वर्षात असं बघितलं नाही. सत्ताधारीच येऊन आंदोलन करतात.. सभागृहाचं कामकाज लहानपणापासून बघत आलोय, असा गोंधळ कधी पाहिला नव्हता.
आम्ही राज्यपाल हटाव ही मागणी सतत करत आहोत. या महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात आंदोलन करत आहेत. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना वाचवण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात आम्ही NIT घोटाळा उघडकीस आणला आहे. सभागृहात यावर चर्चाच होऊ नये, यासाठी हा मुद्दा उकरून काढला आहे. यावरून 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलंय, हेच दिसून येतं, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी काल दिशा सालियान आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली. सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या फोनवर AU नावाने ४४ कॉल आले होते, हा AU नावाने कुणाचा नंबर सेव्ह होता, याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
AU चा संबंध आदित्य उद्धव ठाकरेंशी आहे का? हे एकदा समोर आलं पाहिजे, अशी मागणी करत आज सकाळपासूनच सत्ताधाऱ्यांनी जोरदार मागणी केली. विधानभवन परिसरातच भारत गोगावले आदी नेत्यांनी ये AU AU क्या है… अशा आशयाचे बॅनर घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर सभागृह सुरु झाल्यानंतरही याच मुद्द्यावरून जोरदार गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर सदर प्रकरणी SIT चौकशीचे आदेश देण्यात आले.