बारामती : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी (Aditya Thackeray) विधानसभेपूर्वी यात्रा (jan ashirvad yatra) काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. त्यानिमित्ताने काम काय करावं हे समजलं असतं. मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचं मूल्यांकन करता आलं असतं, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी टोला लगावलाय.
आपल्या संस्कृतीत पिक तयार झाल्यावर कुणी दावा करायला आलं तर ते मान्य होत नाही, असाही टोमणा त्यांनी मारला. भाजप सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झालाय. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याऐवजी पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास असल्यामुळे कोणीही पक्षांतर करणार नसल्याचा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर चांगलाच हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे यांनी ऐन विधानसभेच्या तोंडावर ही यात्रा काढली आहे. त्याऐवजी त्यांनी सत्तेत आल्यानंतर ही यात्रा काढली असती तर त्यांना काम कसं करावं हे समजलं असतं. मध्यंतरी काढली असती तर कामांचं मूल्यांकन करता आलं असतं, असा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेकजण भाजप-शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जातं. यावरही त्यांनी उत्तर दिलं. अनेक भाजप नेते आघाडीचे आमदार संपर्कात असल्याच्या वावड्या उठवतात. प्रत्यक्षात मात्र नावं जाहीर करत नाहीत. या सरकारकडून गेल्या पाच वर्षात जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झालाय. 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असं विचारणाऱ्यांना आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असं विचारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पवारसाहेब आणि आजितदादांच्या नेतृत्वावरील विश्वासामुळे कोणीही पक्षांतर करणार नाही, असं ते म्हणाले.