मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दुष्काळी दौरा सुरु होतोय. त्यापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील कर्जबाजारी शेतकरी नामदेव पतंगे शिवसेना भवनात दाखल झाले. शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. नामदेव पतंगे यांची परिस्थिती ऐकल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कर्जाची जबाबदारी उचलली आहे. सोमवारी सकाळी आरटीजीएसच्या माध्यमातून कर्जाच्या रकमेची परतफेड होणार आहे.
शिवसेनेचे खासदार आणि सचिव अनिल देसाई आणि माजी आमदार अरविंद नेरकर यांनी नामदेव पतंगे यांची आदित्य ठाकरे यांच्याशी भेट करून दिली. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पतंगे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे आभार मानले.
उद्धव ठाकरेंचा दुष्काळी दौरा
जून महिना संपत आला तरी अजून पाऊस आलेला नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे शनिवारी नांदगाव भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधतील. पिंपळगाव येथे दुपारी साडेबाराच्या दरम्यान शेतकरी पीक विमा आणि कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल आणि त्यानंतर पुढील मुख्य कार्यक्रमासाठी नांदगाव येथे ते रवाना होतील.
विधानसभेसाठी शिवसेनेचा बैठकांचा धडाका
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा बैठकांचा धडाका सुरु आहे. शिवसेनेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरेंनी संपर्कप्रमुख आणि सहसंपर्कप्रमुखांना कानमंत्र दिला. शिवसेना भवनात ही बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षबांधणी मजबूत करण्याचे आणि एक लाख शाखाप्रमुख नेमण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ‘माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
पक्षबांधणी, पक्ष विस्तार आणि सदस्य नोंदणीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शिवसेना 14 जुलै ते 27 जुलै ‘भगवा पंधरवडा’ साजरा करणार आहे. पक्षाने स्थानिक स्तरावर नेमलेल्या निवडणूक पदाधिकऱ्यांच्या यादीची फेरतपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांशी उद्धव ठाकरे सातत्याने संवाद साधत आहेत, तर आठवडाभरापासून आदित्य ठाकरेंचा मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी विभागनिहाय संवाद सुरु आहे.