दिनेश दुखंडे, मुंबईः एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असलेले मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आज दिवाळीच्या पहिल्याच दिवशी चर्चेत आलेत. किंबहुना सध्या सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याकरिताच हा विषय चर्चिला जातोय.. मिलिंद नार्वेकरांसह केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) गोठवलेलं शिवसेना (Shivsena) हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह पुन्हा चर्चेत आलंय. कारण ठरलंय मुंबईतील वृत्तपत्रांमध्ये झळकलेला मिलिंद नार्वेकरांचा एक फोटो.
MCA कार्यकारिणी निवडणुकीत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मिलिंद नार्वेकर यांना शुभेच्छा देण्यासाठी एक जाहिरात देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईच्या स्थानिक वृत्तपत्रातून ही जाहिरात दिलीय.. मात्र यावर मिलिंद नार्वेकर यांच्या टीशर्टवर धनुष्यबाण चिन्ह दिसत आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलंय. तरीही नेत्याच्या जाहिरातीत हे चिन्ह दिसून आलंय.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने या चिन्हावर दावा केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलंय. तर एकनाथ शिंदेंच्या गटाला ढाल-तलवारीचं चिन्ह मिळालंय.
येत्या 1 नोव्हेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची या प्रकरणी पुढील सुनावणी आहे.
दरम्यान, मुंबईच्या राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.
ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी सध्या तरी अशी स्थिती नाही. किंवा मिलिंद नार्वेकरांसारखे निष्ठावंत असं करू शकणार नाहीत, असं वारंवार सांगण्यात येतंय.
यातच शनिवारी मिलिंद नार्वेकर यांनी केलेल्या एका ट्विटने पुन्हा एकदा खळबळ माजली होती. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे प्रबळ नेते अमित शाह यांच्या वाढदिवसानिमित्त नार्वेकर यांनी त्यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या.