संतोष जाधव, Tv9 मराठी, उस्मानाबाद : राजकारणात (Politics) कोणीच कोणाचा कायमचा विरोधी नसतो आणि मित्रही नसतो. जनतेच्या मनात असेल तेच होते. पण सध्या जनतेचा विचार न करता स्वार्थ साधला जात आहे. शिवाय स्वार्थ साधूनही सध्याच्या मंत्री-आमदारांची भाषा ही सर्वसामान्यांना भावणारी नाही. हे सर्व होत असले तरी लोक डोक्यावरही घेतात आणि वेळप्रसंगी पायाखालीही असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीका केली. लोकप्रतिनिधींना (Public representative) त्यांच्या जबाबदारीचे भान राहिलेले नाही. त्यामुळेच अशी हाणामारीची आणि खाज सुटल्याची भाषा त्यांच्या तोंडात असल्याचे म्हणत पवारांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला.
राजकारण हे निवडणुकांपुरते ठीक आहे. मात्र, विकास कामात राजकारण येऊ नये. काळाच्या ओघात मराठवाड्यातही ऊसाचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यात अधिकचे उत्पादन देणाऱ्या 82032 किंवा 12121 अशा वाणाची लागवड करावी. 265 या वाणाच्या शेतकऱ्यांनी नादीच लागू नये असा सल्लाही त्यांनी दिला.
दुष्काळी जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख होती. पण आता स्थिती बदलली आहे. उजनी आणि सीना कोळेगाव येथून पाण्याची सोय होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीवर भर देणे गरजेचे असल्याचे अजित पवारांनी सांगितले.
तेरणा कारखाना मिळावा म्हणून अमित देशमुख आणि तानाजी सावंत यांनी टेंडर भरले आहे. मात्र, हा वाद कोर्टात असून कोर्टाच्या निकालाशिवाय तेरणा कुणाकडे जाणार हे स्पष्ट होणार नसल्याचेही पवारांनी सांगितले आहे. राजकारण काही असो शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळणे हे महत्वाचे आहे.
मराठवाड्यामध्ये कारखान्यांचे जाळे वाढत आहे. मात्र, या कारखान्यातून गुळ काढताय की इथेनॉल याचे शेतकऱ्यांना काही देणे-घेणे नाही मात्र, चांगला दर अपेक्षित आहे. ऊसाला भाव, वेळेवर पैसे आणि काट्यात घाटा नसावा ह्याच शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत.
शिंदे सरकारमधील आमदार हे चुन चुनके, गिन गिनके मारुंगा अशी भाषा करीत आहेत. येथे काय मोगलाई आहे काय? जनता हुशार आहे, आज डोक्यावर घेतले तर उद्या पायाखालीही घेता येते, हे सर्वांनीच लक्षात घेणे गरजेचे आहे म्हणत त्यांनी आ. संतोष बांगर आणि तानाजी सावंत यांना सूचक इशाराच दिला आहे.