मुंबई : राज्यातील 1 हजार 79 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. मात्र, ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत एक अजब निकाल पहायला मिळाला आहे. कल्याण तालुक्यातील (Kalyan) वाहोली ग्रामपंचायतीला तब्बल वीस वर्षानंतर पहिला सरपंच मिळाला आहे. ठाकरे गटाचे शाहीम सरवले वाहोली ग्रामपंचायतीचे सरंपच झाले आहेत. येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटावर विश्वास दाखवला आहे. यामुळे येथे वेगळाच जल्लोष पहायला मिळत आहे.
कल्याण तालुक्यातील वाहोली ग्रामपंचायत मागील वीस वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली खाली होती. मागील 20 वर्षांनंतर ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.
मात्र, यंदा निवडणुकीवर बहिष्कार न टाकता ग्रामस्थांनी मतदानाचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने शाहीम सरवले यांना सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, वाहोली पाड्यातून कैलास रोहने यांनी थेट सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने येथे निवडणूक घेण्यात आली.
तब्बल वीस वर्षांनतर ग्रामस्थांनी मतदान केले. या निवडणुकीच ठाकरे गटाचे शाहीम सरवले सरपंच म्हणून निवडणून आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि तालुक्यातील एकूण सात ग्रामपंचायतसाठी निवडणूक पार पडली.
यातील कल्याण तालुक्यातील फळेगाव आणि उशीद या दोन ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायत वगळून इतर पाच ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली असून या ग्रामपंचायतीत भाजप 3, ठाकरे गट 2, राष्ट्रवादी 1,तर इतर 1 असा निकाल लागला आहे.