बारामती : लोकसभेच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील मतदान पार पडलं. स्वतःचा प्रचार केल्यानंतर निकालाच्या प्रतीक्षेत असलेले काही उमेदवार आता आराम करत आहेत, तर काही जण राज्याबाहेर जाऊन प्रचार करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे तरुण उमेदवार पार्थ पवार त्यांची रखडलेली कामे करत आहेत. शिवाय ते कुटुंबासह थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची लढत उत्सुकतेचा विषय बनली होती. मावळसाठी आता मतदान तर झालंय, पण पार्थ पवार सध्या काय करत आहेत याबाबत आम्ही माहिती काढली. ते सध्या पुणे आणि मुंबई दौरा करुन व्यवसायाची रखडलेली कामे करत आहेत. शिवाय निवडणुकीच्या धामधुमीत आजीची भेट झाली नव्हती. त्यामुळे काटेवाडीत जाऊन ते आजीची भेट घेणार आहेत.
मुंबई आणि पुण्यातील कामे आटोपल्यानंतर पार्थ पवार बारामतीत असतील. काटेवाडीत जाण्याचं त्यांचं नियोजन आहे. शिवाय शेतातही ते फेरफटका मारणार आहेत. ते छोट्यामोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. अजून कुठेही फिरायला गेलो नसलो तरी कुटुंबासह एक ते दोन दिवस थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणार असल्याचं पार्थ पवार यांनी सांगितलं.
मावळची हायप्रोफाईल लढत राज्याचं लक्ष वेधून घेणारी ठरली होती. पार्थ पवार त्यांच्या हटके प्रचाराने अनेकदा ट्रोल झाले, तर त्यांच्या पहिल्या भाषणाचीही जोरदार चर्चा झाली. पण नंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी मावळ मतदारसंघ पिंजून काढला. 29 एप्रिलला मावळसाठी मतदान झालंय. त्यामुळे उमेदवार आता निकालाची वाट पाहत आहेत.
VIDEO : मावळमध्ये कोण मारणार बाजी?