मुंबई : जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर आग्रही आहेत. युतीत ही जागा भाजपकडे असल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता उस्मानाबादचाही तिढा वाढलाय. कारण, विद्यमान खासदार रविंद्र गायकवाड हे नेहमीच नॉट रिचेबल असतात असा आरोप करत सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांनी दंड थोपटले आहेत. ‘मातोश्री’वर येऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर स्वतःची बाजू मांडली.
उस्मानाबादसाठी सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, खासदार रवींद्र गायकवाड आणि मकरंदराजे निंबाळकर यांच्या नावावर खल सुरू आहे. शिवसेनेतील अजातशत्रू अनिल खोचरे यांचा सर्वपक्षीयांशी असलेला संपर्कामुळे तेही इच्छुक आहेत. शिवसेनेचा 30 वर्षांपासून असलेला एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून खोचरेंना उमेदवारी देण्याची मागणी केली जात आहे, शिवाय त्यांचे भाजपशीही सौहार्दाचे संबंध आहेत.
गायकवाड यांची प्रतिमा नॉट रिचेबल खासदार म्हणून ‘मातोश्री’वर सांगण्यात आली आहे. मकरंदराजे यांच्या हॉटेलचे बांधकाम नियमबाह्य आहे, त्यामुळे उमेदवारी बाद होऊ शकते. मकरंदराजे पक्षांतर करण्यासाठी ओळखले जातात. ते मूळचे राष्ट्रवादीचे आहेत. तर विद्यमान खासदार यांच्या विरोधात सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी दंड थोपटलेत. पक्षाने आता फक्त घराणेशाहीचा विचार करू नये, नवीन लोकांनाही संधी दिली पाहिजे, अशी मागणी खोचरेंनी केली.
उस्मानाबादचे शिवसेना खासदार संपूर्ण देशाला तेव्हा माहित झाले, जेव्हा त्यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलाने मारहाण केली होती. यानंतर एअर इंडियाने त्यांना काळ्या यादीतही टाकलं होतं, शिवाय संसदेतही हा मुद्दा गाजला होता. पण मतदारसंघात ते नेहमीच नॉट रिचेबल असतात, असा आरोप केला जातोय. म्हणून उस्मानाबादच्या सहसंपर्कप्रमुखांनीच आता खासदारांची गाऱ्हाणी करत उमेदवारी मागितली आहे.