अमरावती : नवनीत राणा (Navneet Rana Audio Clip) यांच्यानंतर आता रवी राणा (Ravi Rana) यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. एका तरुणानं फोन करुन रवी राणा यांना हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) बोलून दाखवण्याची मागणी केली आहे. पाच लाख लोक तुम्हाला लाईव्ह ऐकतायत असं म्हणत, या तरुणानं हनुमान चालिसा म्हणून दाखवा, असं चॅलेंज दिलं होतं. या तरुणाला तू कुठून बोलतो आहेस, तुझं नाव काय आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला होता. त्यावर या तरुणानं आपलं नाव पारीस कादरी असल्याचं म्हटलंय. मी नागपूर महाराष्ट्रातून बोलतोय, असंही ते म्हणालेत. महागाई, बेरोजगारी या विषयांवर बोलण्याऐवजी तुम्ही हनुमान चालिसेचा मुद्द्यावरुन का वाद घालत आहात, असा सवाल या तरुणानं केला आहे.
हनुमान चालिसा म्हणून दाखवा, असं हा तरुण सातत्यानं आवाहन करत होता. तुम्ही जर हनुमानाचे सच्चे भक्त आहात, तर हनुमान चालिसा म्हणूनच दाखवा, असं चॅलेंज देणाऱ्या या तरुणानं फोनवरुन वाद घातलाय. एकूण 8 मिनिटं 3 सेकंदांची ही ऑडिओ क्लिप असून या ऑडिओ क्लिपचा शेवटचा भाग पूर्णपणे म्युट असल्याचं निदर्शनास आलंय.
मंदिर-मज्जीद चे विषय काढून हिंदू मुस्लिम लोकांमध्ये भांडण लावता, असं म्हणत या तरुणानं सुनावलंय. यावेळी कथित व्हायरल ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगमध्ये आमदार रवी राणा आणि फोन करणाऱ्या तरुणामध्ये बाचाबाची झाल्याचं ऐकायला मिळालंय. हनुमान चालीसेचा तुम्ही विरोध करता का? असा सवाल रवी राणांनी तरुणाला उपस्थित केला होता.
दरम्यान, याआधी नवनीत राणा यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात नवनीत राणा यांना हनुमान चालिसा म्हणून दाखवण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. ऐका नवनीत राणांची व्हायरल ऑडिओ क्लिप
गुढी पाडव्याच्या सभेतून राज ठाकरेंनी मशीदीवरील भोंग्यविरोधात हनुमान चालीसा चालवण्याची हाक दिली आणि तेव्हापासून राज्याचं राजकारण अजूनही हनुमान चालीसा भोवती फिरत आहे. यानंतर मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याच्या मुद्द्यावरुन नवनीत राणा आणि रवी राणा हे चांगलेच चर्चेत आले होते.