जळगाव : एकीकडे बच्चू कडू (Bachu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांचातील वाद विकोपाला गेला असतानाच आता शिंदे गटातील आणखी दोन नेत्यांचा वाद समोर आला आहे. मंत्री गुलाबराव पाटील विरूद्ध आमदार चिमणराव पाटील असा नवा वाद समोर आला आहे. गुलाबराव पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. आमदारांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिंदे गटासमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.
शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्याला माझ्याविरोधात निधी दिला जात असल्याचं चिमणराव पाटील यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
दुसरीकडे आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वाद देखील मिटण्याचं नाव घेत नाहीये. रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा आम्ही सात ते आठ आमदार एक नोव्हेंबरला वेगळा विचार करू असा इशाराच बच्चू कडू यांनी राज्य सरकारला दिला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या खोक्याच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे.
मी एकटाच गुवाहाटीला गेलो नव्हतो, माझ्यासोबत आणखी पन्नास आमदार होते. राणा यांच्या आरोपांमुळे त्या 5o आमदारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 50 आमदारच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.