लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला अपेक्षित जागांपैकी कमी जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप नेतृत्व मुख्यमंत्री योगी यांच्यावर नाराज आहेत. केंद्रात मोदी सरकार स्थिर झाल्यानंतर आता भाजप नेतृत्वाने उत्तर प्रदेशमध्ये लक्ष देण्यास सुरवात केली आहे. यामुळेच नवी दिल्लीमध्ये राजकीय पारा चढला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. सुमारे तासभर ही बैठक चालली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत कोणतेही विचारमंथन झाले नाही. मुख्यमंत्रीपदी योगी हेच राहतील, मात्र, संघटनेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे योगी यांच्या मंत्रिमंडळातही थोडा बदल होऊ शकतो. तसेच, संघटनात्मक निवडणुक घेण्यासाठी हायकमांडची तयारी सुरू आहे असेही या सूत्रांनी सांगितले.
यूपी भाजप अध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी एक तासाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांना संघटनेची माहिती दिली. उत्तर प्रदेशामध्ये 10 विधानसभेच्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. राज्यातील कार्यकर्त्यांना कोणत्या पाठिंब्याची गरज आहे. यूपीमधील पक्ष संघटनेत नवसंजीवनी देण्याची गरज आहे, हे ही यावेळी प्रदेशाध्यक्षांनी पंतप्रधान यांना सांगितले.
मुख्यमंत्री योगी यांनी या पोटनिवडणुकीसाठी 30 मंत्र्यांची टीम तयार केली आहे. परंतु, या टीममधून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मुख्यमंत्री योगी यांच्या बैठकीमध्ये समाजवादी पक्षाच्या पीडीए फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि भारत आघाडीने जो संभ्रम पसरवला होता तो कसा दुर करता येईल यावरही या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्र्यांना नेते आणि कार्यकर्ते म्हणून सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले.
कॅबिनेट मंत्री स्वतंत्र देव सिंह यांनी या बैठकीची माहिती देताना सांगितले की, ‘महापूर, विकासकामे आणि आगामी निवडणुकांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गेल्या पंधरवड्यात राज्यातील 17 जिल्ह्यांतील 700 हून अधिक गावांना पुराचा फटका बसला आहे. आगामी निवडणुकांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पोटनिवडणुका होणाऱ्या सर्व 10 विधानसभा जागा आम्ही जिंकू असे त्यांनी सांगितले.