लातूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यातील औसा येथे संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 9.30 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी घोषणा झाल्यानंतर पहिल्यांदाच महायुतीची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
कालपासूनच या सभेची जोरदार तयारी सुरु आहे. या सभेसाठी लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यातून जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त लोक जमतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या सभेत कोणतीही विपरीत घटना घडू नये यासाठी दीड हजारांपेक्षा जास्त पोलिस ताफाही कार्यक्रमस्थळी आयोजित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमाला पाण्याची बॉटल, बॅग किंवा इतर काहीही वस्तू आत नेण्यास मनाई केली आहे.
लातूर आणि उस्मानाबादच्या शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे व नरेंद्र मोदी यांची ही सभा आयोजित करण्यात आली आहे. लातूरमध्ये भाजपचे सुधाकर शृंगारे हे उमेदवार आहे. त्यांची थेट लढत काँग्रेसच्या मच्छिंद्र कामत यांच्याशी होत आहे. तसेच या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गारकर यांनाही लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लातूर येथे भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होणार आहे.
Will be campaigning in Maharashtra, Karnataka and Tamil Nadu.
Looking forward to addressing rallies in Latur, Chitradurga, Mysuru and Coimbatore.
Do watch the rallies live on the NaMo App. @BJP4Maharashtra @BJP4Karnataka @BJP4TamilNadu
— Chowkidar Narendra Modi (@narendramodi) April 9, 2019
तर उस्मानाबाद येथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत. त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी होणार आहे. राणाजगजितसिंह हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत, तर त्यांचे वडील डॉ .पद्मसिंह पाटील हे अनेक वर्षे मंत्री राहिलेले आहेत. तसेच शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे देखील या अगोदर शिवसेनेकडून आमदार राहिले आहेत. त्यामुळे उस्मानाबादमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे ही सभा घेत आहेत. जवळपास दीड वर्षानंतर मोदी-ठाकरे एकत्र एका व्यासपीठावर येत आहेत. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, रिपाई नेते रामदास आठवले, रासप नेते महादेव जानकर अशी अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. येत्या 18 एप्रिलला म्हणजेच दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी मतदान पार पडणार आहे.
संबंधित बातम्या :
पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरेंची उद्या महाराष्ट्रातली पहिली सभा