नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार विरोधात विरोधी पक्ष एकवटणार आहेत. दिल्लीच्या जंतर-मंतरवर भाजप विरोधी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने या महारॅलीचं आयोजन केलं आहे. या महारॅलीला मोठ-मोठे राजकीय चेहरे एकाच मंचांवर दिसणार आहेत. या महारॅलीमध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, माजी पंतप्रधान एचडी देवगौडा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला सहभागी होणार आहेत.
आपचे दिल्ली संयोजक गोपाल राय यांनी सांगितले की, समाजवादी पक्ष, द्रमुक, राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षाचे नेतेही या महारॅलीत सहभाग घेणार आहेत. त्याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही या महारॅलीचं आमंत्रण पाठवल्याचे राय यांनी सांगितले. मागील महिन्यात तृणमूल काँग्रेसच्या भाजप विरोधी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व नेत्यांना या महारॅलीचं निमंत्रण पाठवण्यात आले आहे, असेही राय यांनी सांगितले.
सूत्रांनुसार, लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशा परिस्थितीत, भाजप आणि एनडीएला आव्हान देण्यासाठी या महाआघाडीच्या उद्देशाने विपक्षी नेत्यांना एकत्र आणण्यासाठी या महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.