अमरावती : अमरावती शहरातून एत तरुणी बेपत्ता झाली होती. या प्रकरणात खासदार नवनीत राणा(Navneet Rana) यांनी लव्ह जिहादचा आरोप करत थेट पोलिस ठाण्यात थयथयाट केला होता. पोलिसांनी या बेपत्ता तरुणीला अवघ्या काहीच तासात शोधून काढले. या तरुणीच्या स्टेटमेंटमुळे नवनीत राणांच्या अडचणी वाढल्या आहेत. बेपत्ता तरुणीच्या कुटुंबियांनी नवनीत राणांविरोधात बदमानी केल्याची तक्रार दाखल केली आहे. यानंतर आता MIM सह भीम आर्मी(Bhim Army ) देखील नवनीत राणांविरोधात आक्रमक झाली आहे.
लव्ह जिहादच्या आरोपा नंतर अमरावतीत एमआयएमने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. खासदार नवनीत राणा या राजकीय पोळी शेकण्यासाठी हिंदू-मुस्लिमामध्ये वाद लावत आहेत. लव्ह जिहादचा खोटा प्लॅन आखून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमने केला आहे.
एमआयएमने पोलिस आयुक्तालय कार्यायासमोर मोर्चा काढून नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. लव्ह जिहादच्या आरोपावर भाजप व काही पक्षाकडून टार्गेट केलं जातं आहे. अमरावती दंगली नंतर खासदार अनिल बोंडें, खासदार नवनीत राणा आणि आमदार प्रवीण पोटे यांना तडीपार का केलं नाही? असा सवालही एमआयएमने उपस्थित केला आहे.
एम आय एमने दिले पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. लव्ह जिहाद, हनुमान चालीसामुळे अमरावती शहराचे नाव बदनाम होत असल्याचा आरोप एमआयएमने केला आहे.
दुसरीकडे भीम आर्मी संघटना नवनीत राणा यांच्या विरोधात रस्त्यावर उतरली आहे. नवनीत राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेने केली आहे.
नवनीत राणा यांच्या विरोधात आज भीम आर्मी संघटनेच्या वतीने अमरावती शहरातील डॉ. आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.
नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली व त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला या प्रकरणात नवनीत राणा यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.