मुंबईः परतीच्या पावसानं (Monsoon) राज्यात विविध भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांतील शेती पाण्याखाली गेली आहे. ऐन दिवाळीत मुसळधार पावसामुळे उभं पिक गेल्याने शेतकरी हवालदील झालाय. त्यामुळे राज्यात (Maharashtra Rain) ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने करण्यात येतेय. मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती अद्याप नाही, असं स्पष्ट सांगितलंय.
ते म्हणाले, ओला दुष्काळ नसला तरी शेतीचं जे नुकसान झालंय, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत शेतीचं वस्तुनिष्ठ पंचनामे कऱण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. दिवाळीत काही कर्मचारी, अधिकारी सुटीवर असतील, पण पुढील पंधरा दिवसात पंचनाम्याचा अहवाल देतील. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांसाठी नुकसानीची भरपाई देण्याची मागणी केली. अतिवृष्टी झालेल्या शेताचे अद्याप पंचनामे झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केलाय.
शेतकऱ्यांना मदत न मिळाल्याने विदर्भ-मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 72 जीआरच्या मदतीने सवलती दिल्याची घोषणा झाली. पण शेतकऱ्यांना ही मदत पोहोचलेलीच नाही, असा आरोप दानवे यांनी केला.
दिवाळीचा शिधादेखील राजकीय स्वरुपाचा आहे. शिध्यासाठीच्या पिशव्यांवर फक्त राजकीय नेत्यांचे फोटो आहेत. सरकारचे 513 कोटी रुपये स्वतःचं प्रदर्शन करण्यासाठी वापरावेत का? असा सवाल दानवेंनी केला. याविरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचं दानवे म्हणाले.