मुंबई : अहमदनगर आणि धुळे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दोन्ही ठिकाणी सर्वच पक्षांनी आपापली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही यासाठी सभा घेतल्या. त्यामुळे निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे.
त्यातही धुळे महानगरपालिकेची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. कारण भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपलाच आव्हान दिल्याने धुळ्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मतदारांनी जास्तीतजास्त मतदान करावे यासाठी प्रशासनाने देखील जनजागृती केली, त्यामुळे आता मतदार याला किती साथ देतात हे महत्वाचे असणार आहे.
अहमदनगर महापालिका निवडणूक
अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे. या दरम्यान मतदारांना प्रलोभन दाखवले जाऊ नये, धमकावले जाऊ नये, पुढील काळात पैसे वाटप होऊ नये, यासाठी आता प्रभागनिहाय एकूण 23 पथके तैनात करण्यात आली आहेत. कुणी उमेदवार मतदारांना प्रलोभन दाखवत असल्यास तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त आणि निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी मोबाईल क्रमांक जाहीर केला आहे. नागरिकांना त्यावर तक्रार करण्याचे अवाहन करण्यात आले आहे. तसेच मतमोजणी होईपर्यंत शहरात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील प्रमुख ८ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेला बंदोबस्त :
73 इमारतीत 367 मतदान केंद्र राहणार आहेत. यातील केडगाव, सारसनगर आणि मुकुंदनगर येथील 11 इमारतीतील 41 केंद्र अतिसंवेदनशील आहेत, तर 137 संवेदनशील आहेत. त्यामुळे पोलिसांनीही चोख बंदोबस्त लावला आहे. या सर्व निवडणुकीवर व्हिडीओ कॅमेरा सोबतच ड्रोन कॅमेरानेही नजर ठेवली जाणार आहे.
निवडणुकीसाठी 17 प्रभागांतील प्रत्येकी 4 याप्रमाणे 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत. मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 आहे.
अहमदनगरमध्ये कुठल्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?
धुळे महापालिका निवडणूक
धुळे महानगरपालिकेत एक जागा बिनविरोध झाली असून 73 जागांसाठी आज मतदान होणार आहे. भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आपल्या लोकसंग्रामच्या तिकीटावर स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत. याचा फटका भाजपला बसू शकतो.
महापालिकेच्या 73 जागांसाठी 355 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
धुळ्यात कुठल्या पक्षाचे किती उमेदवार रिंगणात?
LIVE UPDATE :
– अहमदनगर महानगरपालिकेच्या 68 जागांसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. मात्र सकाळची वेळ असल्याने मतदानाला गर्दी कमी
– सकाळी गर्दी कमी असली तरी नागरिकांत उत्साह. काही वयोवृद्ध मतदारांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
– धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. रविवार असल्याने सकाळच्या सुमारास मतदानाला थंड प्रतिसाद, मात्र दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा.
– अहमदनगरच्या पालिकेसाठी एकूण 68 जागांसाठी निवडणूक होत आहे.
– महापालिकेच्या 73 जागांसाठी 355 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
– भाजपाची धुरा ज्यांच्या हातात होती ते भाजप खासदार दिलीप गांधी यांनी परिवारासह मतदानाचा हक्क बजावला
– धुळ्यात सकाळी साडे आकरा वाजेपर्यंत 9.5 टक्के मतदान. दुपार नंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता.
– अहमदनगरला मनपाच्या निवडणूकीत साडे अकरा प्रर्यंत 19 टक्के मतदान
– धुळ्यात १२ वाजे पर्यंत १२% मतदान