अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. (Ahmednagar BJP former MP Dilip Gandhi Dies of COVID in New Delhi)
माजी खासदार दिलीप गांधी यांचे आज (बुधवार 17 मार्च) पहाटे निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दिलीप गांधी यांचा कोरोना रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला होता. दिलीप गांधी हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे माजी खासदार होते.
दिलीप गांधी यांची राजकीय कारकीर्द
सुरुवातीला नगरसेवक म्हणून अहमदनगर महानगरपालिकेत त्यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. नंतर ते नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाचे नेते झाले. 1985 मध्ये ते अहमदनगर महानगरपालिकेचे उपाध्यक्ष झाले. भाजपच्या अहमदनगर जिल्हा संघटनेत सरचिटणीस, सहसचिव आणि अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत.
केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाची धुरा
दिलीप गांधी 1999 मध्ये अहमदनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 29 जानेवारी 2003 ते 15 मार्च 2004 या कालावधीत ते केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री होते. 2004 मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार तुकाराम गडाख यांच्याकडून गांधींना पराभवाचा धक्का बसला होता. (Ahmednagar BJP former MP Dilip Gandhi Dies of COVID in New Delhi)
मोदी लाटेत मोठा विजय
2009 मध्ये दिलीप गांधी पुन्हा अहमदनगरमधून लोकसभेवर निवडून गेले. 2014 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ते दोन लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पुन्हा निवडून आले होते. त्यावेळी पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने संपूर्ण देशभरात मोठा विजय मिळवला होता.
दिलीप गांधींचे तिकीट कापून सुजय विखेंना उमेदवारी
2019 मध्ये दिलीप गांधी यांचे तिकीट कापून भाजपने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली. यावेळी दिलीप गांधी नाराज असल्याच्या चर्चा होत्या. राधाकृष्ण विखे पाटील यांनी गांधींची भेट घेऊन मनोमीलन केल्याचंही बोललं जात असे. अखेर, सुजय विखेंनी भाजपची जागा राखली.
संबंधित बातम्या :
दिलीप गांधींच्या भेटीवर विखे पाटलांनी अखेर मौन सोडलं!
(Ahmednagar BJP former MP Dilip Gandhi Dies of COVID in New Delhi)