शिर्डी | 30 ऑगस्ट 2023 : इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. या बैठकीसाठी देशभरातील नेते मुंबईत दाखल होत आहेत. अशात भाजपच्या खासदाराने या बैठकीची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला विकास बघण्यासाठी प्रत्येकजण फिरतोय. मोदींजींनी देशात केलेली कामं यानिमित्ताने त्यांना पहायला मिळेल. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया, समुद्राचं वारं, रात्री उद्धव ठाकरेंकडे पुरणपोळी असा कार्यक्रम आहे. हे सगळं पर्यटन असून देशाच्या पर्यटनाला गती देण्याचं काम इंडिया आघाडीचे लोक करत आहेत. मोदींजींनी केलेला विकास पाहून निवडणूकीच्या आधी सर्व थांबून घेतील, असं खासदार सुजय विखे म्हणालेत.
मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीतून राधाकृष्ण विखे पाटील वगळण्यात आलं आहे. त्यावर सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आठ सिटर गाडी असली तर कुणीतरी उतरल्याशिवाय कुणीतरी बसू शकत नाही. भाजपने राधाकृष्ण विखे पाटलांना मोठा मानसन्मान आणि मंत्रिपद दिलंय. छोट्या गोष्टींवर चर्चा कशाला? हा फार मोठा विषय नाही. पक्षाचा आदेश हा अंतिम असतो. आम्ही तीन पक्ष एक कुटुंब आहोत. ते समितीत असल्याचे मलाही माहीत नव्हतं आज बातम्या ऐकून कळालं, असं सुजय विखे पाटील म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आधी मला तिकीट फायनल होऊ द्या. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने अद्याप तिकीट जाहीर केलेलं नाही. शिर्डी आणि अहमदनगर लोकसभेत जो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो वापरेल तोच खासदार होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असं सुजय विखे म्हणालेत.
कुणीही आपल्या शेतावर रोटा मारू नका. पिकाच्या नुकसानीची नोंद होणं अपेक्षित आहे. विमा उतरवल्या लोकांनी पिकाचा फोटो काढावा. राज्य सरकार ज्यावेळी भरपाई देईल त्यावेळी अन्याय होणार नाही, असं अवाहन सुजय विखे यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
दुष्काळाची परिस्थिती पाहता अजितदादांनी तो निर्णय घेतला होता. राज्य शासन फक्त कर्जाची हमी देते पैसे नाही. कर्ज एनसिडीसीच्या माध्यमातून केंद्र उपलब्ध करून देतं. अडचणीत असलेले कारखाने योगायोगाने भाजपच्या लोकांचे आहेत. मविआने तीन वर्षे अन्याय केला म्हणून आम्ही अडचणीत आलो. तीन वर्षांची अडचण आतातरी दूर व्हावी यासाठी काम चालू आहे. कुठलाही पक्षपातीपणा होणार नाही, असंही विश्वास सुजय विखेंनी व्यक्त केला.