पुणे : एकिकडे सुप्रीम कोर्टात (Supreme court) शिंदे विरुद्ध ठाकरे (Thackeray) गटातील लढाई अंतिम टप्प्यापर्यंत येऊन ठेपली असतानाच महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मूठ अधिकच घट्ट आवळलेली दिसून येतेय. निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच महाविकास आघाडीने शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देण्यासाठी राज्यभरात संयुक्त सभांची घोषणा केली आहे. राज्यात विभागनिहाय ७ ठिकाणी महाविकास आघाडीच्या एकत्रित सभा होतील. या सभांची जबाबदारी प्रत्येक विभागातील महत्त्वाच्या नेत्यावर देण्यात आली आहे. हा नेता शिवसेना, काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस या तीनपैकी कोणत्याही पक्षाचा असला तरीही सर्वांनी मिळून त्या त्या विभागातील सभा यशस्वी करायची आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं. राज्यातील कोणत्याही ठिकाणी महाविकास आघाडीत फूट पडता कामा नये, असा दमही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. मुंबईत वाय बी सेंटर येथे महाविकास आघाडीची संयुक्त बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी राज्यातील महत्त्वाच्या 7 सभा कुठे होतील, याची घोषणा केली. या संयुक्त सभांना अजित पवार, उद्धव ठाकरे तसेच नाना पटोले उपस्थित असतील.
महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची सुरुवात मराठवाड्याचं प्रवेशद्वार असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथून होणार आहे. येथील सभा यशस्वी करण्याची जबाबदारी ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. संभाजीनगरातील सभेचं ठिकाण प्रचंड मोठं असावं, येथील सभा अतिभव्य करण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांच्या नेत्यांवर असेल, यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय.