बारामती : हर्षवर्धन पाटील विनाकारण पवार कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत (Ajit Pawar on Harshwardhan Patil). इंदापूरमधील त्यांच्या सभेनंतर मी 50 ते 55 फोन केले, घरीही जाऊन आलो, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar on Harshwardhan Patil) यांनी केला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपप्रवेश केला.
हर्षवर्धन पाटील विनाकारण पवार कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत. इंदापूरमध्ये त्यांनी आयोजित केलेल्या सभेनंतर मी 50 ते 55 फोन केले. माझ्या पीएसोबत त्यांच्या पुण्यातील घरीही जाऊन आलो. पण ते भेटले नाहीत, असं अजित पवारांचं म्हणणं आहे.
लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं : हर्षवर्धन पाटील
लोकसभेवेळी पक्षाचे नेते इंदापूरबाबत जो निर्णय घेतील तो आपण मान्य करु असं सांगितलं होतं. हर्षवर्धन पाटील यांनाच भाजपमध्ये जायचं होतं, असं असताना त्यांनी खोटं बोलून आम्हाला लक्ष्य केलं (Ajit Pawar on Harshwardhan Patil), असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील या दोघांपैकी विधानसभा किंवा विधानपरिषद या माध्यमातून संधी देऊन तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न होता, असंही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले होते हर्षवर्धन पाटील?
लबाड राष्ट्रवादीने शब्द देऊन फसवलं, आघाडीचा धर्म पाळूनही राष्ट्रवादीने अन्यायच केला. आमच्या सभ्यपणाचा फायदा राष्ट्रवादीने घेतला, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी मनातली खदखद व्यक्त केली होती.
शरद पवारांनी मला लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी बोलवलं आणि त्याठिकाणी राष्ट्रवादीचं काम करण्याचं सांगितलं. त्यानंतर सुप्रिया सुळे माझ्या घरी भेटायला आल्या होत्या, त्यानंतर साडेचार वर्षांनंतर पहिल्यांदा अजित पवारांचा फोन आला भेटायला यायचं. दहा वेळा अजित पवारांनी फोन केला होता. आणि त्यानंतर मेळावा घेऊन काँग्रेसने सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला, असं हर्षवर्धन म्हणाले होते.
हर्षवर्धन पाटलांचं भाषण पाहून त्यांना फोन केला, पण फोन लागला नाही : सुप्रिया सुळे
काँग्रेस एकत्र असताना भाऊंना काही कमी त्रास झाला. लोकसभेला भाऊंचं तिकीट कापून अजित पवारांना दिलं होतं. आज विजयदादांना भेटलो, लोकसभेवेळीच का आला नाही, अशी विचारणा त्यांनी केली, असं सांगताना हर्षवर्धन पाटलांकडून अजित पवार यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात आला होता.
लोकसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुळेचे काम करतील मात्र तीन महिन्यांनंतर विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचं काम त्यांना करावं लागेल, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पुण्यात सुप्रिया सुळे यांना बजावलं होतं, मग त्याचं काय झालं? असा सवाल पाटील यांनी विचारला होता.
तुम्ही जर काँग्रेसला जागा सोडणार होतात, मग शिवस्वराज्य यात्रा इंदापुरात का आली? दौऱ्यात इंदापूर नव्हते मग कसे का आलात? आता यापुढे लबाड माणसांसाठी काम करायचं नाही, अशी दुखरी नस त्यांनी बोलून दाखवली होती.