मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जून हा वर्धापन दिन दरवर्षी उत्साहाने साजरा होतो, मात्र कोरोना संकटामुळे यंदा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये. त्या ऐवजी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे राज्यभर आयोजन करण्यात यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले आहे. (Ajit Pawar appeals to donate blood on NCP foundation Day)
“राष्ट्रवादी पक्ष येत्या 10 जून रोजी 21 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. कोरोना संकटामुळे हा वर्धापन दिन सार्वजनिकरित्या व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येणार नसला तरी वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही, परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया आणि अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी पुढे यावे, स्वत: रक्तदान करावे, इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे आणि रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा, असे आवाहन अजित पवार आणि जयंत पाटील यांनी केले.
हेही वाचा : दोन माजी आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
राज्यावरील कोरोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊनच्या काळात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल या दोन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन आभार मानले. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना तसेच अडचणीत असलेल्या बांधवांना पक्षीय आणि वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असेही आवाहन दोन्ही नेत्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून हा वर्धापन दिन दरवर्षी उत्साहाने साजरा होतो, मात्र कोरोना संकटामुळे यंदा सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान शिबिरांचे राज्यभर आयोजन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks व जलसंपदामंत्री @Jayant_R_Patil केले आहे.#NCP2020 pic.twitter.com/jDPiBCOwCO
— NCP (@NCPspeaks) June 4, 2020