कल्याण: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडण्याचा सपाटा चालूच ठेवला आहे. राष्ट्रवादीच्या कल्याणमधील सभेत तर त्यांनी फडणवीस सरकारवर टीका केलीच, मात्र त्यांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना विशेष लक्ष्य केलं. माहिती व तंत्रज्ञान तसंच वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्रीपद सांभाळत असलेले रवींद्र चव्हाण यांच्या पदवीवरुन अजित पवार यांनी टीका केली. “रवींद्र चव्हाण हे दहावी शिकलेत आणि त्यांना खातं कोणतं दिलंय, तर वैद्यकीय शिक्षण आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. काय डोंबल कारभार करणार? यांच्यातल्या मंत्र्यांची डिग्रीही बोगस आहे” अशा शब्दात अजित पवारांनी रवींद्र चव्हाण यांची खिल्ली उडवली.
रवींद्र चव्हाण यांच्याकडे चार खात्याचा राज्यमंत्रीपदाचा भार आहे. बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचं राज्यमंत्रीपद रवींद्र चव्हाण सांभाळत आहेत. मात्र त्यांच्या शिक्षणावरुन अजित पवारांनी टीका केली.
रवींद्र चव्हाण यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्या प्रतिज्ञापत्राच्या पान नंबर 16 वर रवींद्र चव्हाण यांनी आपलं शिक्षण दहावी पास असं नमूद केल्याचं एडीआरच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे. रवींद्र चव्हाण यांनी न्यू इंग्लिश स्कूल भांडुपमधून 1986 साली दहावी पास झाल्याचं नमूद केलं आहे.
अजित पवारांचं टीकास्त्र
रवींद्र चव्हाण यांच्या शिक्षणावरुन अजित पवारांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. शिवाय भाजप सरकारमधील नेत्यांच्या पदव्या बोगस असल्याचाही आरोप त्यांनी केला.
कोण आहेत रवींद्र चव्हाण?
रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत.
रवींद्र चव्हाण हे सध्या राज्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे 4 खात्यांची जबाबदारी आहे
बंदरे, माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण तसेच अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या खात्याचे राज्यमंत्री आहेत.
रवींद्र चव्हाण यांची 2002 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कल्याण उपजिल्हाध्यक्षपदावर नेमणूक झाली.
2005 मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपद मिळाले.
नगरसेवक पदावर कार्यरत असतानाच 2009 मध्ये डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचा पहिला आमदार होण्याचा मान मिळाला.
2014 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले.
2016 मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.