मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीत दबावतंत्र सुरू केलं आहे. काही दिवसांपूर्वी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी होऊ लागली. आता या मागणीने अधिकच जोर धरला आहे. राष्ट्रवादीच्या काही आमदार आणि नेत्यांनी आज अजित पवार यांच्या घरी धाव घेतली. अजितदादा यांच्या घरी खलबतं सुरू झाली. ही खलबतं सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आपले दौरे रद्द केले. तर काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीत भाकरी फिरवली. त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांना पक्षाचं राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष केले. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह काही नेत्यांना इतर राज्यांची जबाबदारी दिली. मात्र अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी दिली नव्हती. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाही होत्या. त्यानंतर गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी पक्ष संघटनेत पद देण्याची मागणी केली होती. त्यानंतर अजितदादा यांना पक्षाचं प्रदेशाध्यक्ष करण्याच्या मागणीने जोर धरला.
त्यानंतर आज सकाळी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अमोल कोल्हे, धनंजय मुंडे, दौलत दरोडा, हसन मुश्रीफ, किरण लहामाटे, दिलीप वळसेपाटील आदी नेते अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी आले. यावेळी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादा प्रदेशाध्यक्षपदावर अडून बसल्याचंही सांगितलं जात आहे. अजितदादा नाराज असल्याने सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील नियोजित दौरा पुढे ढकलल्याचं सूत्रांनी सांगितलं.
एककीडे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बारामतीत शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्याशी तासभर चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार आज नगर दौऱ्यावर जाणार होते. पण त्यांनीही नगरचा दौरा रद्द केला आहे. पिंपरीचे राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्तेही शरद पवारांच्या पुण्याच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
विलास लांडे आणि नाना काटे दोघेही शरद पवारांच्या मोदी बाग निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी शरद पवार यांच्याशी प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. दैवत म्हणून आम्हीं शरद पवार यांना भेटण्यासाठी आलो आहोत. साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे. शरद पवार एके शरद पवार हेच पिंपरी-चिंचवडमध्ये चालतं. राष्ट्रवादीत गटतट नाही. दादांच्या नेतृत्वात आम्ही काम केलं आहे. शरद पवार हे गट नाही. ते नेते आहेत, असं विलास लांडे यांनी सांगितलं.
दरम्यान, अजितदादा नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज शरद पवार यांची बारामतीत भेट घेणार आहेत. यावेळी ते प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पवारांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. जयंत पाटील हे आपल्या पदाचा राजीनामा पवारांकडे देण्याची शक्यता असून अजित पवार यांच्या अध्यक्षपदाचाही निर्णय आजच होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जयंत पाटील हे गेल्या पाच वर्ष एक महिन्यापासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आहेत.
दरम्यान, पक्षातील घडामोडीं संदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पक्षाच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. येत्या 6 जुलै रोजी मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यावेळी शरद पवार आमदारांचा कल जाणून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.