पुणेः चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणुकीत (By Election) राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी केलेल्या बंडखोरीचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे. राहुल कलाटेंना उभं करून त्यांना मतांचं विभाजन करायचंय. राहुल कलाटेनेही अनेकदा सांगून ऐकलं नाही. पण हे बेडकाचं फुगलेपण आहे. त्याचं काही खरं नसतं, असा इशारा देत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांचा समाचार घेतला आहे. तर महाविकास आघाडी आता एकत्रितपणे या निवडणुकीत उतरण्यासाठी सज्ज असल्याचं ठामपणे सांगितलं. पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकांतील मविआ उमेदवार नाना राटे यांच्या प्रचारार्थ आज जाहीर मेळावा घेण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, शिवसेनेचे आदित्य ठाकरे तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे या मेळाव्याला उपस्थित होते.
अजित पवार यांनी राहुल कलाटे यांच्या बंडखोरीवरून जाहीर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘ काही जण म्हणतात आम्हीच फॉर्म ठेवायला लावले. त्याचा दुरान्वये संबंध नाही. आम्ही समोर बोलतो रोखठोक बोलतो. आम्ही शेवटपर्यंत त्याला सांगितलं फॉर्म मागे घ्या.. आता एकदा त्याला कळू द्या त्याच्या मागे किती मतं आहेत
मागील वेळेला मला १ लाख मतं पडली होती, पण ती पक्ष म्हणून पडली होती हे त्याला कळत नाहीये. बेडकाला वाटतं .. बेडकाला वाटतं मीच फुगलो. ते फुगलेपण काही खरं नसतं. याचा बोलवता धनी दुसराच कुणीतरी दिसतोय. त्यांनी सांगितलं असेल तू फॉर्म ठेव. विरोधकांना वाटलं असेल त्याचा फॉर्म राहिल्यानंतर आपल्याला सोपं जाईल, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
मराठवाडा शिक्षक मतदार संघातही राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्रदीप साळुंखे यांनीही ऐनवेळी बंडखोरी केली. निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. अजित पवार यांनी या सभेत साळुंखे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ‘ मराठवाड्याची शिक्षक मतदार संघाची निवडणूक होती. आमच्या ऐका पट्ट्याने बंडखोरी केली. त्याला सुप्रियाने समजावले, जयंत पाटील यांनी समजवण्याचा प्रयत्न केला. माझा फोन लागला नाही. मला समजावता येत नाही. बरे झाले फोन लागला नाही, माझ्या लोकांनी सांगितले त्याला 500 मते पडतील. तो तर महाराष्ट्रात फिरलाय. त्याला 400 मते पडली. खरे तर पक्ष मागे असतो तेंव्हाच विजय होतो, असं अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं.