मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. यासोबत अजित पवारांच्या नावे तीन वेगवेगळ्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद भूषवण्याचा अनोखा विक्रमही (Ajit Pawar Deputy CM) रचला गेला आहे.
आधी काँग्रेस, त्यानंतर भाजप आणि आता शिवसेना अशा तीन विविध पक्षांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम अजित पवारांनी नोंदवला आहे. अवघ्या सव्वा महिन्यांच्या कालावधीत अजित पवारांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. विशेष म्हणजे दोन्ही वेळा अजित पवारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली.
आज, विधानभवनात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. देशाची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखेन. कामे निष्ठेनं पार पाडेन. कामाबाबतची गोपनीयता पाळेन,अशी प्रतिज्ञा केली.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) December 30, 2019
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 32 दिवसांनंतर ठाकरे सरकारचा पहिला विस्तार पार पडला. विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.
ठाकरे सरकारचा पहिला ‘महाविस्तार’, 26 कॅबिनेट, दहा राज्यमंत्र्यांचा शपथविधी
विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला.
अजित पवार हे बारामती मतदारसंघातून सलग सात वेळा आमदारपदी निवडून आले आहेत.
सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपद
अजित पवार यांनी भाजपसोबत 23 नोव्हेंबरला सकाळी अचानकपणे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अवघ्या तीन दिवसांतच त्यांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस सरकार कोसळलं होतं.
याआधी, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदी असताना अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची धुरा होती. नोव्हेंबर 2010 ते सप्टेंबर 2012 आणि ऑक्टोबर 2012 ते सप्टेंबर 2014 या कालावधीत अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती.
राष्ट्रवादीचे मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे)
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
अनिल देशमुख – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)
आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. (Ajit Pawar Deputy CM)