नागपूर : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज या अधिनेशनाचा नववा दिवस आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अनुपस्थितीवरून अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. पुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलं. मग पुन्हा अजितदादांनी फडणवीसांना (Devendra Fadnavis) सवाल केला. अजित पवार आणि फडणवीस यांच्यात ही प्रश्नउत्तरं बराच वेळ चालली.
देवेंद्रजी आपण स्वत: मुख्यमंत्री होता. आपण अनेक मुख्यमंत्र्यांचं कामही पाहिलेलं आहे. त्यामुळे प्रश्न उत्तराच्या तासाला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं. दुसऱ्या खात्यातील एखादा प्रश्न असेल तरी मुख्यमंत्र्यांनी तो सोडवायला हवा. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपस्थित नाहीत, याचं उत्तर सरकारने द्यावं, असं अजित पवार म्हणाले.
याला उममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात उपस्थित राहतील पण आम्हाला माहितीच नव्हतं की विरोधक आज सभागृह चालू देणार आहेत म्हणून…, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर सभागृहात हश्या पिकला.
विरोधक आज सभागृह चालवत आहात म्हणून मुख्यमंत्र्यांना निरोप पाठवतो. आपलं म्हणणं योग्य आहे. मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित राहतील, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस यांच्या या उत्तरानंतर अजित पवार यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला. देवेंद्रजी, सभागृह चालत नाही म्हणून मुख्यमंत्री आले नाहीतस, असं आपण सांगता. मग आपण कसं काय आलात? जर उपमुख्यमंत्र्यांना कळलं की सभागृहात उपस्थित राहायला पाहिजे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगायला नको का?, असं अजित पवार म्हणाले.
मला वाटलेलं आजही सभागृह चालतच नाही म्हणून येणार नव्हतो. पण जेव्हा कळालं की सभागृह चालतंय. तेव्हा घाईघाईत आलो, असं फडणवीस म्हणाले.
अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. त्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित केलं जातं. त्याचाच धागा धरत फडणवीसांनी अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं.