मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मावळमध्ये मुलगा पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवार यांनी भाष्य केलं. मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे, असं अजित पवार म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पराभव केला.
याबाबत अजित पवार म्हणाले, “मावळमध्ये झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे. जनतेने या निवडणुकीत दिलेला कौल स्वीकारला आहे.आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे. दुष्काळाची समस्या मोठी आहे, त्याचा मुकाबला कसा करायचा याबाबत आम्ही चर्चा केली”
काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
लोकसभा निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आज बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबत रणनीती ठरली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, यांच्यासह मित्र पक्षातील हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी उपस्थित होते.
पार्थची जागा जिंकून येणारी नव्हती : शरद पवार
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निकालाबाबत भाष्य केलं होतं. पार्थची जागा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, जिंकून येणारी ती जागा नव्हती पण आम्ही प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
मावळचा निकाल
मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी बाजी मारली. पार्थ पवार यांचा 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव झाला,
संबंधित बातम्या
बाळासाहेब विखेंच्या नातवावर गुलाल, पवार साहेबांच्या नातवाबद्दल बोलणार नाही : विखे