पुण्यात अजित पवारांनी बैठक बोलावली, राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांची दांडी

| Updated on: Jul 18, 2019 | 8:16 PM

या बैठकीला पुण्यातील 42 पैकी 20 नगरसेवकांना दांडी मारली. अजित पवारांनी बोलवलेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांची पाठ फिरवल्यामुळे ही बैठक चर्चेत राहिली. अजित पवारांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांनाही संबोधित केलं.

पुण्यात अजित पवारांनी बैठक बोलावली, राष्ट्रवादीच्या 20 नगरसेवकांची दांडी
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या विविध ठिकाणी पक्षाच्या आढावा बैठका घेत आहेत. पुण्यातही त्यांनी आगामी विधानसभेचा आढावा घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला पुण्यातील 42 पैकी 20 नगरसेवकांना दांडी मारली. अजित पवारांनी बोलवलेल्या पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीकडे राष्ट्रवादीच्याच नगरसेवकांची पाठ फिरवल्यामुळे ही बैठक चर्चेत राहिली. अजित पवारांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांनाही संबोधित केलं.

अजित पवारांनी बोलावल्या बैठकीला न जाण्याचं धाडस राष्ट्रवादीमध्ये सहसा कुणीही करत नाही. पण पुण्यातील एक-दोन नव्हे, तर तब्बल 20 नगरसेवकांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्यामुळे कुजबूज सुरु झाली होती. नगरसेवकांना हात वर करुन अजित पवारांनी नगरसेवकांची हजेरी घेतली. गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांकडून अनुपस्थित राहण्यामागचं कारण मागण्यात आलं आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या नगरसेवकांवर काय कारवाई होते ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे आता सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरात सुरु आहे. पुण्यातील नगरसेवकांची अनुपस्थितीही याचाच भाग नव्हता ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत पुण्याची जागा काँग्रेसकडे होती. या ठिकाणी भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचा मोठ्या फरकाने विजय झाला होता. त्यामुळे अजित पवारांनी पुन्हा एकदा पुण्याकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.

पुणे शहर आणि ग्रामीण कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना आगामी विधानसभा निवडणुकीत 145 चा आकडा गाठण्याचं लक्ष्य अजित पवारांनी बोलून दाखवलं. त्या अनुषंगाने एकजुटीनं कामाला लागा. सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत केलेली चुकीची कामं, घेतलेले चुकीचे निर्णय हे जनतेपर्यंत पोहोचवा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

दरम्यान, त्यापूर्वी अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित लावत अनेक मुद्यांवर कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या बैठकीला आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप सरकारने पिंपरी चिंचवडची वेस्ट सिटी केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

पाहा व्हिडीओ :