मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन महिला उलटला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) झालेला नाही. सध्या केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच राज्याचा गाडा हाकत आहेत. अशावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शिंदे आणि फडणवीसांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अजितदादांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. शिंदे आणि फडणवीस या दोघांनी त्यांच्या मोठ्या बैठकीत त्यांनी चर्चा केली. आढावा घेतला. तुम्ही विचार करा. त्या कॅबिनेटमध्ये 45 खुर्च्या असतात. बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, ते काय करतात हे पाहत असतात. त्यामुळे त्यांच्यावर रिकाम्या खुर्च्यांचं टेन्शन असतं. आपण दोघांनी काही चुकीचं करू नये बरं. काही चुकीचं करू नये बरं, असं ते या रिकाम्या खुर्च्यांना पाहून म्हणत असतात, अशी खिल्ली अजित पवारांनी उडवली आहे. त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळाने (NCP Delegation) आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आदी नेते आज राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले. त्यावेळी अजित पवार यांनी राज्यपालांना एक पत्रही दिलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारासह राज्यातील काही प्रश्नांकडे राज्यपालांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय.
आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी आम्हाला सव्वाचारची वेळ दिली होती. राज्यपालांनी आमचं सगळं ऐकून घेतलं. विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील काही भागात झालेली अतिवृष्टी आणि अडचणीत आलेला शेतकरी याकडे त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी. महिना झाला तरी मंत्रिमंडळ विस्तार नाही. त्यामुळे पावसाळी अधिवेशन होत नाही. लोकांवरच सगळी जबाबदारी होतेय. मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती पण त्यांचा पुणे दौरा असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही. उद्या कॅबिनेट असल्यामुळे त्यांची वेळ मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय टीमला बोलावण्याबाबत अद्याप चर्चा नाही, कुणाचं वक्तव्य नाही. त्यामुळे केंद्राकडून काही मदत मिळण्याची अपेक्षा ठेवावी की नाही अशी स्थिती आहे. या सर्व गोष्टी आम्ही राज्यपालांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांनी सांगितलं आहे की मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, जनतेला संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याची आमची मागणी आहे, असंही अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
तत्पूर्वी अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. अजित पवार यांनी विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे. उद्या कॅबिनेटची बैठक आहे ती ‘फक्त दोघांची’ महत्त्वाची कॅबिनेट बैठक आहे, असा खोचक टोलाही अजित पवार यांनी यावेळी ‘दोघांच्या’ सरकारला लगावला. कुणी कितीही काही म्हटले तरी जनतेच्या मनात जे आहे तेच घडणार आहे, असेही अजित पवार यांनी जेपी नड्डा यांच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सांगितलं.
अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्यात शेतकरीवर्गाच्या सोयाबीनवर गोगलगायीच्या आक्रमणामुळे काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हे सांगतानाच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला परंतु त्यांनी केंद्रसरकारला अद्याप कळवले नाही, त्यामुळे केंद्राची टीम पाहणी करण्यास आली नसल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.