मंत्रालयातील कथित शापित केबिनबद्दल अखेर अजित पवार बोलले

| Updated on: Jan 02, 2020 | 12:44 PM

पवार कुटुंब अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. मी वरिष्ठ नेत्यांप्रमाणे क्रम लावायला सांगितलं, असं म्हणत अजित पवार थेट मोबाईलमधील यादी दाखवायला सरसावले.

मंत्रालयातील कथित शापित केबिनबद्दल अखेर अजित पवार बोलले
Follow us on

मुंबई : मंत्रालयातील 602 क्रमांकाची केबिन मी नाकारली नाही, पवार कुटुंब अंधश्रद्धा मानत नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कृषीमंत्र्यांची केबिन राजकीय कारकीर्दीसाठी ‘अनलकी’ ठरत असल्याच्या चर्चा गेल्या पाच वर्षांपासून रंगल्या आहेत. त्यावर अजित पवारांनी थेट मोबाईलमधील यादी वाचत स्पष्टीकरण दिलं. तसंच, मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज होईल, असंही अजित पवारांनी (Ajit Pawar on Mantralaya Cabin) सांगितलं.

सीताराम कुंटे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं दालन माझ्या केबिनजवळ आहे. 602 क्रमांकाची केबिन मी नाकारली नाही. मी त्यांना वरिष्ठतेनुसार केबिन देण्यास सांगितलं होतं. 2020 सुरु झालं आहे. 21 व्या शतकात कोणीही शापित वगैरे गोष्टी मानत नाही. पवार कुटुंब अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही. मी वरिष्ठ नेत्यांप्रमाणे क्रम लावायला सांगितलं, असं म्हणत अजित पवार थेट मोबाईलमधील यादी दाखवायला सरसावले. आधी मला, मग अशोक चव्हाण, त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि शेवट राज्यमंत्र्यांवर केला, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

मुंबईतील इंदू मिलमध्ये प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम 14 एप्रिल 2022 पर्यंत करण्याचा प्रयत्न राहील, असंही अजित पवारांनी सांगितलं. इंदू मिलमधील स्मारकाचं काम कुठपर्यंत आलं आहे, काही अडचणी आहेत का हे समजून घेण्यासाठी आलो होतो. काही गोष्टींसाठी मंत्रिमंडळाची परवानगी घ्यावी लागेल. बऱ्याचशा परवानग्या मिळाल्या आहेत. आणखी काही परवानग्या घ्यायच्या आहेत, मात्र त्या केंद्राच्या नसून राज्य सरकारच्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

मागच्या सरकारने काय केलं त्याचं ऑडिट करायला मी आलो नाही. ही इमारत ग्रीन बिल्डिंग असेल. इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं जाईल. झाडं वाढवली जातील. माणूस अनुभवातून शिकतो. आम्ही काही सूचना केल्या आहेत. त्या अयोग्य असतील, तर त्याचा हट्ट आम्ही सोडतो. स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या काही सूचना असतील तर त्यापण बघाव्या लागतील, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.

वाचा : मंत्रालयातील ‘त्या’ केबिनचा रंजक इतिहास

कुणाच्या फायद्यासाठी एवढा मोठा रस्ता अरुंद करण्यात आला, याची माहिती पुणे महापालिका आयुक्तांकडून घेणार, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील कथित रस्ता घोटाळ्यावर अजित पवारांनी भाष्य केलं. पडणारे पडले, निवडून येणारे निवडून आले, आता सरकारही स्थापन झालं, असं म्हणत इतर पक्षातील तिकीटवाटपांविषयी बोलण्यास अजित पवारांनी नकार दिला.(Ajit Pawar on Mantralaya Cabin)