मुंबई : 30 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचं अजित पवारांनी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना (Ajit Pawar on Cabinet Expansion) सांगितलं.
अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉलनुसार स्वतःहून जागा बदलून घेतली. थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं. हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांशी झालेल्या गप्पांवरुन स्पष्ट केलं.
विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपण राष्ट्रवादीतच असल्याचं सांगितल्याच्या मुद्द्यावर बोलण्यास अजित पवारांनी नकार दिला.
एक लाख कोटींची अर्थव्यवस्था हे फडणवीस सरकारचं गिमीक : जयंत पाटील
हातची सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांचं दुःख मी समजू शकतो. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. कावळ्यांच्या शापाने गाया मरत नाही, असा टोला अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येणार असल्याचं सूतोवाच अजित पवारांनी केलं.
‘शेतकरी कर्जमाफीवरुन कुणीही श्रेयवाद करु नये, हे महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यांचं ते श्रेय आहे, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने कर्जमाफीवरुन केलेल्या पोस्टरबाजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी उत्तर दिलं.
विस्ताराचा मुहूर्त ठरला
नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. सेना-राष्ट्रवादी यांची विस्ताराची यादी तयार असून काँग्रेसमध्ये मंत्रिपदं देण्यावरुन खल सुरु असल्याने विस्तार लांबल्याचं बोललं जातं.
काँग्रेसच्या वाट्याला महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम ही 3 महत्वाची खाती आहेत. त्यापैकी बाळासाहेब थोरातांकडे महसूल खातं देण्यात आलं. त्यामुळे दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची हायकमांडकडे मागणी करण्यात आली. मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावं चर्चेत आहेत.
शिवसेनेकडील महत्त्वाची खाती – मुख्यमंत्री, गृह, नगरविकास, उद्योग, कृषी, क्रीडा आणि परिवहन, सार्वजनिक बांधकाम
राष्ट्रवादीकडील महत्त्वाची खाती – अर्थ, गृहनिर्माण,राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य, ग्रामविकास, सहकार आणि जलसंपदा
काँग्रेसकडील महत्त्वाची खाती – महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण, सार्वजनिक बांधकाम, वैद्यकीय शिक्षण
Ajit Pawar on Cabinet Expansion