बारामती, पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावर भाष्य केलंय. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिंदे-फडणवीस एकत्र आल्यास काहीही चुकीचं नाही. काही अडचण नाही, असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणालेत. दिवाळीनिमित्त पवार कुटुंब बारामतीत आहे. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कवरच्या मनसेच्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तेव्हा राज ठाकरे आणि शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले. तेव्हापासून युतीच्या चर्चा होत आहेत. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिवाळीचा सण आहे. दोन वर्षानंतर हा सण आपण साजरा करतोय.त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं. शुभेच्छा द्याव्यात. त्यात चुकीचं काय? राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे तिघे एकत्र आले असतील तर त्याच्यात चुकीचं काय आहे?, असं अजित पवार म्हणालेत.
राज ठाकरे आणि भाजप तसंच शिंदेगटाच्या नेत्यांच्या वाढत्या भेटींमुळे युतीच्या चर्चा होत आहेत. त्यातच काल शिंदे-फडणवीस एकाच मंचावर पाहायला मिळाले. त्यावरून पुन्हा एकदा युतीची चर्चा होतेय. त्यावर शिंदेगटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही भाष्य केलंय. मनसेसोबत युती करायला कोणतीच अडचण नाही, असं शहाजीबापू म्हणालेत.
माझ्या माहितीनुसार मनसे बरोबर युती होण्याला कोणतीही अडचण नाही. तिन्ही पक्षाचा अजेंडा आणि बेस हिंदुत्वाचा आहे. त्यामुळे एका आधारावर या तिन्ही नेत्यांना एकत्र येण्यासाठी राजकारणात मला कोणतीही अडचण वाटत नाही, असं शहाजीबापू म्हणालेत.