आमदार परत गेले तरी… अजितदादा यांचं मोठं विधान; त्या आमदारांना सुनावले

| Updated on: Jul 15, 2024 | 6:44 PM

लोकसभा निवडणुकीत अजितदादांपेक्षा शरद पवारच सरस असल्याचं दिसून आलं आहे. जनतेने अजितदादांपेक्षा शरद पवार यांच्या पारड्यात कौल दिला आहे. त्यामुळे अजितदादा गटातील आमदार अस्वस्थ झाले आहेत. हे आमदार पक्ष सोडून जाण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. त्यावर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परखड विधान केलं आहे.

आमदार परत गेले तरी... अजितदादा यांचं मोठं विधान; त्या आमदारांना सुनावले
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विधान परिषदेत विजय मिळाल्याने महायुतीत त्साह संचारला आहे. महायुतीचे नेते आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. अजितदादा गट तर विधानसभेच्या 288 जागांचा सर्व्हे करणार आहे. जेणेकरून पक्षाची ताकद कळणार असून त्यानुसार उमेदवार देता येणार आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं. तसेच 54 पेक्षा अधिक जागांवर आमचा दावा असेल असं अजितदादा गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच आमदारांबाबतचं एक मोठं विधानही त्यांनी केलं आहे.

विधान परिषद निवडणुकीत अजितदादा गटाचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत केवळ आमदारांनी मतदान करायचे असते. पण लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारले आहे. अजितदादा गटाचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. तर दुसरीकडे जनतेचा कल अजूनही शरद पवार गटाकडे असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अजितदादा गटाचे आमदार शरद पवार यांना जाऊन मिळण्याची शक्यता आहे. त्यावर अजितदादांनी परखडपणे भाष्य केलं आहे. माझ्यासोबतचे सध्याचे आमदार माघारी गेले तरी हरकत नाही. नव्या लोकांना संधी देऊ, असं मोठं विधान अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रोख कुणावर?

आमदार परत गेले तरी हरकत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नव्या लोकांना संधी देण्याचं विधानही त्यांनी केलं आहे. पण त्यांचा रोख कुणाच्या दिशेने आहे, याची आता चर्चा सुरू झाली आहे. अजितदादांना नेमकं कुणाला सुनवायचं आहे? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

कुणालाही प्रलोभनं दिली नाही

विधानपरिषद निवडणुकीत आमदारांना प्रलोभनं दिली नाहीत. अनेक आमदारांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी मला मतदान केलं, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. विधान परिषद निवडणुकीतील विजयाचं रहस्य त्यांनी उघड केलं. तुमच्यावर माझं लक्ष असेल, एवढंच आमदारांना म्हणालो, असंही अजितदादा यांनी स्पष्ट केलं.

दोन्ही खासदार महायुतीचे असते

यावेळी अजितदादांनी लोकसभेच्या जागा वाटपातील त्रुटीही नजरेस आणून दिल्या. दक्षिण नगर आणि माढ्याची जागा भाजपने आम्हाला दिली नाही. दोन्ही जागा दिल्या असत्या तर खासदार महायुतीचे असते. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील खासदार असते, असा दावा त्यांनी केला आहे.