नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेतील सभेत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्याच्या राजकारणात जातीवादाचं विष पेरलं गेलं, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. इतकंच नाही तर शरद पवार कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chatrapati Shivaji Maharaj) नाव घेत नाहीत. महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांचा आहेच. पण त्याआधी तो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांच्या शरद पवारांवरील हल्ल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मोहिमाचा उल्लेख करत राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज श्रद्धाळू होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. लढाईवर, मोहिमेवर जाताना महाराजांनी कधी मुहूर्त पाहिला नाही. शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त मोहिमा आमावस्येच्या रात्री फत्ते केलेल्या आहेत, मोठे-मोठे किल्ले मिळवले आहेत. पूजापाठ कर्मकांडात ते कधी गुंतले नाहीत. त्यांच्या रतयेलाही त्यांनी कधी त्यात गुंतवलं नाही, हा इतिहास आपल्यासमोर आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या जातीधर्माच्या लोकांचा आपण आदर केला पाहिजे. मशिद असेल, चर्च असेल किंवा कुठलंही धार्मक स्थळ असेल, आपण तिथे आदरानेच माथा टेकला पाहिजे. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. पण अशाप्रकारे लोकांना बनवण्याचं, फसवण्याचं काम कृपा करुन कुणी करु नये. त्यातच तुमचं माझं भलं आहे. त्यातूनच महाराष्ट्र एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जाणार आहे. त्यातूनच देशातील औद्योगिकदृष्ट्या, शेती, दूध व्यवसाय, कुक्कुटपालनात तुमच्या माझ्या राज्याचा पहिला नंबर ठेवायचा असेल तर तुम्हाला मला शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जातीय सलोखा ठेवावाच लागेल. त्यात एकमेकांबद्दल आपलेपणाने वागावं लागेल. तरच पुढच्या पिढीचं भलं होणार आहे, असं मत अजित पवार यांनी मांडलं.
इतकंच नाही तर विष कालवणाऱ्या माणसाने काय काम केलं? साधी दूध संस्था, सोसायटी नाही काढली या पठ्ठ्यानं. एक खरबूज, टरबूज सोसायटीही नाही. संस्था चालवण्यासाठी डोकं लागतं. धुडगुस घालण्यासाठी डोकं लागत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. योगींनी मशिद आणि मंदिरांचे भोंगेही बंद केले. साई मंदिराची आरती पहाटे 6 च्या अधी होते. जागरण गोंधळही उशिरा होतो. जत्रा, उरुस चालू आहेत. विरंगुळा म्हणून कार्यक्रम होतात. पोलीसही उठसूठ काही कारवाया करत नाहीत, असंही अजितदादा म्हणाले.
सध्या राजकारण विचित्र दिशेनं सुरु आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी समाजात फुट पाडण्याचं काम करतात. यांनी छत्रपतींच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी केला. पवार शाहू, फुले, आंबेडकर तसंच छत्रपतींच्या विचारानं काम करतात. आमच्या नसानसांत छत्रपती आहेत. कोण तुकडोजी आम्हाला विचारतो? त्यांची भाषणं म्हणजे नुसती नौटंकी असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केलीय.