अजित पवार फोन करुन म्हणाले, अध्यक्ष महोदय, राजीनामा मंजूर करा

| Updated on: Sep 27, 2019 | 6:46 PM

अजित पवारांनी (Ajit Pawar resigns) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करुन राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह केला. राजीनामा योग्य फॉरमॅटमध्ये असल्याने तो मंजूर केल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

अजित पवार फोन करुन म्हणाले, अध्यक्ष महोदय, राजीनामा मंजूर करा
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ माजवणारी घटना घडली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar resigns) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar resigns) विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करुन राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह केला. राजीनामा योग्य फॉरमॅटमध्ये असल्याने तो मंजूर केल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.

अजित पवारांच्या राजीनाम्याचं कारण अजून पक्षातही कुणाला माहित नाही. अजित पवार गुरुवारी दिवसभर बारामतीत होते. त्यांनी पूरग्रस्त भागातही दौरा केला. दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार दिवसभर मुंबईत होते. पक्षात कुणालाही याबाबतची कल्पना नसल्यामुळे सर्व नेते चक्रावून गेले आहेत.

ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, “या राजीनाम्याला कोणतंही महत्त्व नाही, कारण विधानसभेचा कार्यकाळ आता संपत आहे. ते पुन्हा निवडणूक लढवणार नसतील तर याला महत्त्व आहे. पण कोणतंही कारण नसताना राजीनामा देणं ही निश्चितच मोठी घटना आहे.”

राष्ट्रवादीतील लक्षणीय घटना

  • अजित पवार यांचं नाव राज्य सहकार बँक घोटाळ्यात असून, त्यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
  • शरद पवार आणि अजित पवार यांच्यात अनेकदा मतभेत समोर आले. ईव्हीएमच्या मुद्द्यावर दोघांमध्ये सर्वात मोठा मतभेद समोर आला होता.
  •  केंद्र सरकारने कलम 370 काढल्यानंतर पवारांनी त्याचा विरोध केला होता, तर अजित पवारांनी समर्थन केलं होतं.
  •  सभांमध्ये यापुढे राष्ट्रवादीच्या झेंड्यासोबत भगवाही दिसेल असं अजित पवार म्हणाले होते, मात्र शरद पवारांनी त्यालाही विरोध केला होता
  • लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
  • लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला