बारामती : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे जेव्हा भाजपच्या बाजून बोलायचे तेव्हा भाजप नेत्यांना उकळ्या फुटायच्या, आता मात्र ते विरोधात बोलायला लागले की लगेच त्यांची स्क्रिप्ट बारामतीवरुन येते म्हणतात, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी लगावलाय. भाजप नेते विनोद तावडे हे पोपटासारखं बोलतात, अशा शब्दात अजित पवार यांनी राज ठाकरे यांची बाजू घेत भाजप नेत्यांवर निशाणा साधला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हे शेतकरी दिसतात का? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. याच सभेत त्यांनी बारामतीतील कार्यकर्त्यांना फैलावर घेत प्रचाराच्या कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांवर आपल्या खास शैलीत निशाणा साधला. राज ठाकरे हे जेव्हा भाजपच्या बाजूने भाषण करत होते, त्यावेळी भाजपाच्या नेत्यांना आतून उकळ्या फुटत होत्या. आता त्यांच्या विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागल्याची टीका त्यांनी केली.
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत तळ ठोकलाय. याचाच धागा पकडत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील हे शेतकरी वाटतात का असा सवाल करत शेतकरी म्हणून तुमची ओळख होते का असा टोला ही लगावला. तसेच बारामती शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेत मला पाहिजे तसा प्रचार अजून सुरू झालेला नाही, तुम्ही वार्डामध्ये उभे राहता तेव्हा कसा प्रचार करता, तसा सुरू झाला पाहिजे… मला काही सांगू नका.. तुम्हाला वाटत असेल अजित पवार मावळात, शिरूरला गेलाय, मात्र माझे लक्ष असून मला सगळं कळतं असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना गर्भीत इशारा दिला.
बारामतीतील कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत सूचना देताना अजित पवारांनी उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवला. कार्यकर्त्यांनी रुसवा फुगवा न ठेवता काम करावं… नाहीतर माझं नावच घेतलं नाही.. मला विचारलंच नाही.. माझ्याकडे पाहून हसलेच नाहीत असं काही सांगत बसाल.. निकाल आल्यावर खास एक दिवस तुमच्यासोबत हसण्यासाठीच येतो, असं अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत सांगितलं.