मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी कामाचा सपाटा लावला आहे. त्यांची तात्काळ निर्णय प्रक्रिया ही चांगलीच लोकप्रिय होताना दिसली. अनेकांना व्हिडिओ कॉल, अनेकांना कॉल करून (Cm Eknath Shinde Call) थेट निर्देश दिल्याचे त्यांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. तसेच त्याच्या रोज हेडलाईन होत आहेत. काल-परवाच एकनाथ शिंदे यांचा नांदेडमध्ये पूर (Marathwada Flood) आलेल्या भागात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देतानाचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओची ही बरी चर्चा राहिली. मात्र या व्हिडिओनंतर आज अजित पवारांना त्याच वरून एक प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांच्या कामाच्या धडाकेचाही मोठा बोलबाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या व्हिडिओबाबत अजित पवारांना विचारल्यानंतर अजित पवारांनी त्याला तसंच मिश्कील उत्तर दिले.
अजित पवारांना पत्रकारांनी विचारलं की एकनाथ शिंदे थेट अधिकाऱ्यांना फोन लावून काम करतात, कुठल्याही गोष्टीसाठी वेळ घेत नाहीत, त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले मी हे आधीपासूनच करत आलोय. मी माझं काम करतो. सोबत फोनही अधिकाऱ्यांना लावतो. मात्र फोन आणि कॅमेरा एकाच वेळी लावायला सांगत नाही, अशी मुश्किल टिपणी करत अजित पवार पुढे निघून गेले. अजित पवारांची शिस्त, अजित पवारांचं सकाळी लवकर उठणं, सकाळी सात वाजता बैठका घेणे हे सर्वांनाच परिचित आहे. मात्र विरोधकांना त्यांच्या शैली टोमणे मारणे हेही चांगलंच परिचित आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत ही अजित पवारांनी तेच केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून त्यांचं शेड्युल बरेच व्यस्त आहे. त्यातच त्यांचा मध्येच दोन दिवसांचा दिल्ली दौरा झाला. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर असताना इकडे महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला होता. मराठवाड्यातले अनेक जिल्हे पाण्याखाली गेले होते. नांदेड, हिंगोली, परभणी मध्ये तर पूरस्थिती होती. याच पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि याच फोनचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून बरीच चर्चा राहिली होती. त्यालाच अजित पवारांनी आता त्यांच्या स्टाईलने उत्तर दिले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारकऱ्यांना मदत पोहोचवण्याचाही व्हिडिओ कॉलही बराच चर्चेत राहिला. हे नवं राजकारण महाराष्ट्र पहिल्यांदाच बघतोय. त्यात राजकारण रंगणं हेही महाराष्ट्राला नवं नाही.