नागपूर: राज्यात 32 दिवस पाच लोकांचंच मंत्रिमंडळ होतं, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी विरोधकांवर केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. आमच्या सरकारमध्ये पाच नाही तर सात मंत्री होते. तसेच हे सर्व मंत्री मुख्यमंत्रीपदाच्या ताकदीचे होते, असं सांगतानाच अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठाकरे सरकारमधील सुरुवातीच्या सात मंत्र्यांची यादीच वाचून दाखवली. ठाकरे सरकार आलं तेव्हा आजच्या सारखी परिस्थिती नव्हती. तेव्हा राज्यावर संकट नव्हतं. आज मराठवाडा आणि विदर्भात पूरपरिस्थिती आहे. शेतकरी (farmer) व्याकूळ आहे. ही गंभीर परिस्थिती आहे. आम्ही जर काही सांगितलं तर तुम्ही नव्हता का सातजणं? तुम्ही नव्हता का पाचजणं? हे काही उत्तर नाही. पंचनामे कसे होतील, त्यांना मदत कशी मिळेल हे उत्तर पाहिजे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना बियाणे देणं हे उत्तर असलं पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अजित पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच कारभार पाहत आहेत. जोडीला कुणाला घेत नाही असं सांगितलं तर उपमुख्यमंत्र्यांनी काल काही तरी स्टेटमेंट केलं. त्यांनी आमच्या सरकारमध्ये पाच मंत्री असल्याचं सांगितलं. त्यांचा आकडा चुकीचा आहे. सात लोकांनी सुरुवातीला शपथ घेतली होती. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, नितीन राऊत, यांनी शपथ घेतली होती. यातील काहीतर मुख्यमंत्रीपद भूषवू शकतील अशी माणसे होती. त्या सातजणांमध्ये एकनाथ शिंदेही होते. जयंत पाटील ताकदीचे नेते आहेत. भुजबळ ताकदीचे नेते आहेत. मला राजकारणात 25 वर्ष झाली. बाळासाहेब थोरात तर 8 टर्मचे आमदार आहेत. एवढे सीनियर नेते आहेत. तसं यांच्यात दोघेच आहे. त्यांना मुंबईचाही व्याप पाहावा लागतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यावर कोणतंही संकट नव्हतं. निवडणुका झालेल्या होत्या. त्यानंतर सरकार आलं होतं. त्यामुळे त्या काळात काही अडचण नव्हती, असं अजितदादा म्हणाले.
मी ज्या दिवशी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांकडे काही दोन तीन प्रश्न मांडले. आम्हाला जे काही पाहायला मिळतं ते आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो. शेतकरी समस्या अडचणी, पंचनामे झाले नाहीत ते आम्ही त्या त्या जिल्हाधिकाऱ्याच्या ऑफिसला जाऊन त्यांना सांगतो. त्या भागातील खासदार आणि आमदार जाऊन जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना समस्या मांडत असतात, असं त्यांनी सांगितलं.
मला प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे सत्तेत असताना काय करायचं आणि विरोधात असताना काय करायचं हे मला माहीत आहे. मला यात राजकारण करायचं नाही. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं, असं आवाहन त्यांनी केलं.