साहेबांना सोडून गेले नि अकोल्यात काय गत झाली बघा, अजित पवारांच्या पिचड पितापुत्रांना कानपिचक्या

| Updated on: Jan 30, 2021 | 1:18 PM

प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. असं अजित पवार हसत म्हणाले. (Ajit Pawar Vaibhav Madhukar Pichad )

साहेबांना सोडून गेले नि अकोल्यात काय गत झाली बघा, अजित पवारांच्या पिचड पितापुत्रांना कानपिचक्या
अजित पवार
Follow us on

शिर्डी : “काही लोक साहेबांना (राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार) सोडून गेले, अकोल्यात त्यांची काय गत झाली बघा, सोडून गेलेले पडले” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) आणि मधुकर पिचड या पितापुत्रांना टोला लगावला. वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, प्राजक्ता, अहमदनगरमधील सगळ्या जिल्ह्यांकडे व्यवस्थित लक्ष दे रे, माझ्या बारामतीला नंतर लक्ष दिलंस तरी चालेल, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर मिश्किल भाष्य केलं. (Ajit Pawar taunts Vaibhav Madhukar Pichad praises Prajakt Tanpure)

अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी ‌येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी ते बोलत होते.

“विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात दहा, अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. सातवे शंकरराव गडाखही आले, आघाडीतले बाळासाहेब थोरात आले. आशुतोष काळे हा तरुण सहकारी आला, रोहित पवारला कर्जत जामखेडच्या जनतेने आशीर्वाद दिला. संग्राम जगताप दुसऱ्यांदा निवडून आला. शंकरराव सिनिअर आहेत, तेही दुसऱ्यांदा आले. बाळासाहेब थोरात तर 1985 पासून विधानसभेवर आहेत. त्यांची सातवी-आठवी टर्म आहे” असं अजित पवार सांगत आहेत.

“वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय”

“प्राजक्त तनपुरेंना नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास अशा पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मलाही राज्यमंत्रिपद दिलं होतं, मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा. पण मला कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा अशी तीनच खाती होती आणि या पठ्ठ्याला बघा… वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे. प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय” असं अजित पवार हसत म्हणाले.

नाही तर माझाच मामा व्हायचा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे नात्याने मामा आहेत, त्यावरही अजित पवारांनी मिश्किल भाष्य केले. मामाची विकास निधीसाठी मदत घ्या, नाही तर माझाच मामा व्हायचा, असं म्हणत अजित पवार हसले. महाविकास आघाडीचे जे जे नेते येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले.

“कोरोनाचं संकट नसतं तर दुप्पट-तिपटीने पुढे”

दरम्यान, कोरोनाचे सावट अजूनही दूर झालेले नाही. टप्प्याटप्प्याने सर्व सुरु करण्याचा प्रयत्न आहे. मोठ्या गर्दीचे कार्यक्रम टाळतोय. कोरोनाची काळजी घेत राज्याची वाटचाल सुरु आहे. कोरोनाचं संकट नसतं तर दुप्पट-तिपटीने पुढे गेलो असतो. तिन्ही पक्षांची विचारधारा वेगळी आहे. मात्र समान कार्यक्रमावर एकत्र आले. भाजपच्या सत्तेच्या काळात दुजाभाव होत होता. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केली. जीएसटीची रक्कम केंद्राकडे अडकून आहे. पगार, पेन्शनसाठी राज्याचे साडेबारा हजार कोटी खर्च होतात” असं अजित पवार सांगत होते. (Ajit Pawar taunts Vaibhav Madhukar Pichad praises Prajakt Tanpure)

“शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार”

“शेतकरी आंदोलनाला ‌केंद्राने प्रतिसाद द्यायला हवा होता. शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा नेता म्हणजे शरद पवार. शेतकरी कायद्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. अण्णा हजारेंवर उपोषणाची वेळ आली. हे सरकार शेतकरीविरोधी आहे. शेतकरी मोडला तर देश मोडेल. शेतकरी ट्रॅक्टर परेडला हिंसक वळण लागलं. आपला शेतकरी कधीच हिंसा करत नाही. गालबोट लावण्यासाठी कोणीतरी शिरलं आणि आंदोलनास गालबोट लावण्याचा प्रयत्न यातून निश्चित झाला” अशी शक्यताही अजित पवारांनी बोलून दाखवली.

संबंधित बातम्या :

इक्बाल चहल मी लक्षात ठेवेन, शेवटी माझ्या लेकानेच मला महापालिका मुख्यालयात आणलं’ : अजित पवार

VIDEO | “अजित पवार पेट्रोल पंपात भेसळ करतो अशी बोंब व्हायची, आणि…” अजितदादांच्या कोपरखळ्या

राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी आलो आणि अडकलो, बाहेरही पडता येईना : अजित पवार

(Ajit Pawar taunts Vaibhav Madhukar Pichad praises Prajakt Tanpure)