नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. राज्यभरातील पूरस्थितीचा अजित पवार आढावा घेत आहेत. सध्या ते नागपूर दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. किती नुकसान झालं? काय नुकसान झालं? सोयबीनच्या पिकाचं काय झालं?, पंजनामे झाले का? किती नुकसान भरपाई झाली याची माहिती अजित पवार घेत आहेत. नागपूरमध्ये (nagpur) पूरपरिस्थिती आणि शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते आज रात्री यवतमाळला मुक्काम करणार आहेत. त्यानंतर उद्या नांदेड आणि वसमतचा पाहणी दौरा करणार आहेत. तर परवा बीडची पाहणी करून मुंबईला परतणार आहे. यावेळी अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना मी राजकारणासाठी दौरा करत नाही. मला राजकारण (politics) करायचं नाही. सरकारने वरवरच्या घोषणा करू नये. कृती करत पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
राज्याचा दौरा सुरू करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्याकडे तीन मागण्या केल्या आहेत. आमचे खासदार आणि आमदार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडत आहेत. पूरपरिस्थितीची माहिती देत आहेत. पंचनामे अद्याप सुरू झाले नसल्याचंही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं जात आहे. मला प्रशासनाचा अनुभव आहे. त्यामुळे सत्तेत असताना काय करायचं आणि विरोधात असताना काय करायचं हे मला माहीत आहे. मला यात राजकारण करायचं नाही. फक्त वरवर घोषणा नको. कृती झाली पाहिजे. अजून शेतकऱ्यांचे पंचनामे सुरू झाले नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घालावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
पुरात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना सरकारने पैसे दिले. पण पाळीव जणावरांची भरपाई दिली नाही. त्यामुळे वेळेत पैसे द्यायला हवेत, असं ते म्हणाले. मी नागपूरमधील लोकांना भेटलो. आता पुढच्या कार्यक्रमाला चाललो आहे. राजकारण करण्यासाठी दौरा करत नाही. दुसऱ्याने निवेदन देऊन त्यावर बोलणं आणि आपण प्रत्यक्ष पाहणी केल्यावर त्यातील बारकावे समजतात. त्यावर सभागृहात चांगलं मांडलं जातं, असं त्यांनी सांगितलं.
मी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या नाही. स्थानिक पदाधिकारी भेटायला आले होते. निवडणुका असल्यावरच तयार राहावे असे नाही, सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणुकांच्या तयारीत असलं पाहिजे. तहान लागल्यावर आम्ही विहीर खोदत नाही. आधीच विहीर खोदतो. त्यानंतर तहान लागल्यावर पाणी पितो. अनेक समस्या होत्या. त्या जाणून घेतल्या, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, गडचिरोलीतील आलापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचा मुद्दा अजित पवारांसमोर गाजला. राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक दिवसापासून राष्ट्रीय परिवहन महामंडळाची बस सेवा या मार्गावर बंद आहे. हा रस्ता दुरुस्त करून बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आलापल्ली ते सिरोंचा या 100 किलोमीटरच्या प्रवासासाठी प्रवाशांना तीनशे रुपये मोजावे लागतात. गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते सिरोंचा शंभर किलोमीटरचा मार्ग जवळपास तीन वर्षापासून खराब आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वनविभाग नाहरकत देत नसल्यामुळे कामं थांबलेली आहेत, असं नागरिकांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिलं.