भाजप की राष्ट्रवादी? अजित पवारांचं उत्तर

| Updated on: Nov 24, 2019 | 5:20 PM

आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी दिली.

भाजप की राष्ट्रवादी? अजित पवारांचं उत्तर
Follow us on

मुंबई : मी राष्ट्रवादीमध्ये आहे, आणि कायमच राष्ट्रवादीसोबत राहीन. शरद पवार साहेबच आमचे नेते आहेत, असं ट्वीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत भाजपच्या प्रत्येक नेत्याचे आभार मानणारे ट्वीट करुन अजित पवारांनी ‘घरवापसी’ न करण्याचे संकेत (Ajit Pawar Tweet on NCP) दिले होते.

आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात एक स्थिर सरकार देईल. ही आघाडी राज्य आणि लोकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करेल, अशी हमी अजित पवारांनी दिली.

‘काळजी करण्याची गरज नाही, सर्व काही ठीक आहे. मात्र थोडा संयम आवश्यक आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार’ असंही अजित पवार पुढे म्हणाले.

उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यानंतर रविवारी संध्याकाळच्या सुमारास अजित पवारांनी एकामागून एक ट्वीट करण्यास सुरुवात केली. अजित पवार यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धन्यवाद, आपण राज्याला एक स्थिर सरकार देऊ. जे लोकहितासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी काम करेल’ असं त्यांनी ट्विटवर म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी एकापाठोपाठ एक भाजपच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे आभार मानले.

बंडानंतर अजित पवारांचे 10 मिनिटांत 16 ट्विट

त्यानंतर राष्ट्रवादीसोबत असल्याचं सांगत अजित पवार यांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे प्रयत्न केले. परंतु अजित पवारांनी परतण्याची तयारी दर्शवली नव्हती.

चुलत बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे, पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांना माघारी फिरण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही अजित पवारांची भेट घेऊन आले. तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली.

अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच आणि पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचं मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत.

अजित पवार कालचा दिवस बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी थांबले होते. त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवारही होते. त्यानंतर आज सकाळी दोघं मुंबईतील निवासस्थानी गेले.

अजित पवार यांनी बंड करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संख्याबळ दाखवण्यासाठी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना भुलवून त्यांनी राजभवनावर नेल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विधीमंडळ नेतेपदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. परंतु पक्षातील त्यांचं सदस्यत्व कायम (Ajit Pawar Tweet on NCP) आहे.